भारतासाठी चीनला आडकाठी

Dainik Gomantak
शुक्रवार, 3 जुलै 2020

सुरक्षा परिषदेत चीनच्या निवेदनात जर्मनी, अमेरिकेकडून अडथळे
 

नवी दिल्ली

पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजवर झालेल्या ‘भ्याड दहशतवादी’ हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने आज तीव्र शब्दांत निषेध केला. मात्र, या निषेधाबाबतचे चीनने तयार केलेल्या निवेदनावर सही करण्यासाठी जर्मनी आणि अमेरिकेने विलंब करत चीन आणि पाकिस्तानविरोधातील नाराजी प्रकट केली. तसेच, आपण भारताच्या पाठीशी आहोत, हे स्पष्ट सांगण्यासाठीच त्यांनी निवेदन प्रसिद्ध करण्यात अडथळे आणल्याचे विश्‍लेषकांचे मत आहे.
पाकिस्तानच्या कराचीमधील स्टॉक एक्सचेंजवर सोमवारी (ता. २९) दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये पाच सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला होता, तर हल्ला करणारे चारही दहशतवादी मारले गेले होते. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या फुटीरतावादी संघटनेने केलेल्या या हल्ल्यामागे भारताचेच पाठबळ असल्याचा आरोप पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी आणि नंतर पंतप्रधान इम्रान खान यांनीही केला होता. भारताने हा आरोप साफ फेटाळला होता. चीनने मंगळवारी (ता. ३०) पाकिस्तानमधील या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणाऱ्या निवेदनाचा मसुदा मांडला. ‘या भ्याड आणि क्रूर हल्ल्याचा सुरक्षा परिषद निषेध करत आहे. सर्व प्रकारच्या दहशतवादापासून जागतिक शांततेला आणि सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांना आणि त्यांना आश्रय व पाठबळ देणाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर मिळून कारवाई करावी आणि पाकिस्तानला सहकार्य करावे,’ असे निवदेनात म्हटले आहे.

असा केला विलंब
चीनने सुरक्षा परिषदेच्या मौन प्रक्रियेद्वारे हा मसुदा मंजुरीसाठी मांडला. या प्रक्रियेअंतर्गत मंजुरीसाठी निश्‍चित कालावधी ठरवला जातो आणि त्यावेळेपर्यंत कोणीही आक्षेप घेतला नाही तर मसुदा आपोआप मंजूर होऊन तो प्रसिद्ध केला जातो. चार वाजेपर्यंत आक्षेप नोंदविण्याची वेळ होती. ही वेळ संपत असतानाच अखेरच्या क्षणी जर्मनीने अधिक वेळ मागवून घेतला. हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारने भारतावर केलेले आरोप अमान्य असल्यानेच त्याचा निषेध म्हणून जर्मनीने ही आडकाठी आणल्याचे सूत्रांनी सांगितले. जर्मनीच्या या कृतीवर चीनने नाराजीही व्यक्त केली. मात्र, मसुदा मंजुरीसाठी वेळ दुसऱ्या दिवशी (१ जुलै) सकाळी दहापर्यंत वाढविण्यात आली. ही वेळही संपत आली असताना अमेरिकेनेही आणखी एक दिवस मागवून घेतला. यानंतर अखेर आज निवेदन प्रसिद्ध झाले. मात्र, या दोन्ही देशांनी भारताला मूक समर्थन व्यक्त करत चीन आणि पाकिस्तानविरोधात जागतिक पातळीवर असलेली नाराजीच दाखवून दिल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

संबंधित बातम्या