चीनकडून परिस्थितीचा गैरफायदा

PTI
बुधवार, 15 जुलै 2020

जपानचा आरोप ; नवीन संरक्षण धोरण स्वीकारले

टोकियो

सागरी क्षेत्रावरील आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी चीन जोरदार प्रयत्न करत असून त्यासाठी कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचाही ते गैरफायदा घेत आहेत, असा आरोप जपान सरकारने केला आहे. भौगोलिक स्थितीमुळे सामर्थ्यवान झालेल्या चीनपासून जपानला मोठा धोका संभवत असल्याचेही जपानने म्हटले आहे.
पंतप्रधान शिंझो अबे यांच्या मंत्रिमंडळाने स्वीकारलेल्या संरक्षण धोरणाबाबतचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. दक्षिण चिनी समुद्रावरील चीन सरकारचे सर्व दावे अमेरिकेने फेटाळल्यानंतर लगेचच जपानने हे धोरण स्वीकारत आक्रमक पवित्रा घेतला आहे. चीन आणि उत्तर कोरियापासून असलेल्या संभाव्य धोक्यांची नोंद घेत संरक्षण सिद्धता वाढवण्यासाठी जपान प्रयत्नशील असल्याचे या अहवालावरून स्पष्ट दिसत आहे. अबे यांच्या नेतृत्वाखालील जपानने संरक्षण खर्चात भरीव वाढ केली आहे.

चीनवरील आरोप
- कोरोनाबाबत चुकीच्या माहितीचा प्रसार करून जगात खळबळ उडवून देणे आणि या परिस्थितीचा फायदा उठवत स्वतःचा प्रभाव वाढवणे
- जपानच्या अधिपत्याखालील समुद्रात चिनी युद्धनौकांचा वावर
- जपानच्या बेटांवर दावा करणे
- उत्तर कोरियाचा अण्वस्त्र कार्यक्रम आणि त्याला चीनचे पाठबळ
- उत्तर कोरियाचा आक्रमक आणि बेभरवशाचा स्वभाव

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या