दक्षिण चिनी समुद्रात चीनने सोडले क्षेपणास्त्र

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

दक्षिण चिनी समुद्रात अमेरिकेला प्रत्युत्तर

बिजिंग: दक्षिण चिनी समुद्रात चीनने विमानभेदी क्षेपणास्त्र सोडले. नौदल सरावाचा एक भाग म्हणून हे करण्यात आले असले तरी अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याचा मुख्य उद्देश होता.

वादग्रस्त क्षेत्रात अमेरिकी विमानांनी हेरगिरी केल्याचा आरोप चीनने केला आहे. दक्षिण आणि पूर्व चिनी समुद्रातील चीनचे  दावे शेजारील देशांनी अमान्य केले आहेत. मानवनिर्मित बेटाचे लष्करीकरण करण्याच्या दिशेनेही चीनने हालचाली केल्या असून त्या आघाडीवर लक्षणीय प्रगती केली आहे. या बेटाचे संरक्षण करण्याचा आपल्याला हक्क असल्याचा चीनचा दावा आहे.

चीनने बुधवारी सकाळी हैनान प्रांत आणि पॅरासेल बेटे यांच्यातील भागात दोन क्षेपणास्त्रे सोडली असे वृत्त साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने गुरुवारी दिले. डीएफ-२६ या दुहेरी क्षमता असलेल्या क्षेपणास्त्रावर बंदी आहे. शीतयुद्धाच्या अखेरीस अमेरिका आणि रशिया यांच्यात तसा करार झाला होता. गेल्या वर्षी अमेरिकेने या तहातून माघार घेतली. त्यावेळी चीनने अशी क्षेपणास्त्रे मोक्याच्या ठिकाणी ठेवल्याचे कारण अमेरिकेने पुढे केले होते.

एकूण दोन क्षेपणास्त्रे
वायव्येकडील क्विंगहाइ प्रांतातून डीएफ-२६बी, तर पूर्वेकडील झिजियांग प्रांतातून डीएफ-२१डी हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. हे क्षेपणास्त्र लढाऊ विमाने वाहून नेणाऱ्या नौकांविरुद्ध वापरले जाते. पहिल्या क्षेपणास्त्राची क्षमता चार हजार किलोमीटर टप्प्याची आहे. प्रतिस्पर्ध्याची जमिनीवरील किंवा नौदलाची ठिकाणे आण्विक किंवा पारंपरिक हल्ल्याने उद््ध्वस्त करण्यासाठी ते वापरले जाते. दुसऱ्या क्षेपणास्त्राची क्षमता अठराशे किलोमीटर इतकी आहे.

संबंधित बातम्या