दक्षिण आफ्रिकेतील किनारे संसर्गामुळे बंद

दैनिक गोमन्तक
बुधवार, 16 डिसेंबर 2020

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने दक्षिण आफ्रिकेतील स्थिती बिघडत असल्याने अध्यक्ष सिरिल रामफोसा यांनी देशातील काही लोकप्रिय समुद्रकिनारे बंद करण्याचा निर्णय घेतला

जोहान्सबर्ग: कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने दक्षिण आफ्रिकेतील स्थिती बिघडत असल्याने अध्यक्ष सिरिल रामफोसा यांनी देशातील काही लोकप्रिय समुद्रकिनारे बंद करण्याचा निर्णय घेतला असून देशात लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अशी सूचना दिली आहे. 

रामफोसा यांनी काल सायंकाळी दूरचित्रवाणीवरून जनतेला आवाहन करताना म्हटले, की गेल्या दोन आठवड्यात देशातील रुग्णांची संख्या वाढली आहे. जर तातडीने कारवाई न केल्यास दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक ठरु शकते. आफ्रिकेत गेल्या दहा दिवसात दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. सध्या दररोज ८ हजाराहून अधिकांना कोरोनाची बाधा होत आहे. याच कालावधी कोरोनामुळे दररोज होणाऱ्या मृत्यूची संख्या सुमारे ५० टक्क्यांनी वाढली आहे. याप्रमाणे मृतांची संख्या १०० हून दीडशेवर पोचली आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक बाधा ही १५ ते १९ वयोगटातील मुलांना होत आहे. याबद्धल अध्यक्षांनी चिंता व्यक्त केली आहे. 

जादा संख्येने आयोजित करण्यात येणारे सोहळे, पार्ट्या आणि प्रोटोकॉलचे पालन न करणे यामुळे कोरोनाची संख्या वाढत असल्याचे ते म्हणाले. अध्यक्षांच्या नव्या घोषणेनुसार ख्रिसमसच्या काळात आणि नवीन वर्षातही कोविड नियमांचे कडकरित्या पालन केले जाणार आहे. गर्दीची ठिकाणे विशेषत: समुद्र किनारे आणि बाग बगिच्यांना १६ डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात निर्णय घेण्यात आला आहे. 

युवावर्ग मोठ्या संख्येने पार्ट्यांत सहभागी होत असून सर्रास मद्यपान करत आहेत. यादरम्यान ते सोशल डिस्टन्सिंग आणि सरकारच्या नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. 
- ज्वेली मखिजे, आरोग्य मंत्री

संबंधित बातम्या