पाक लष्करप्रमुखांचे असेही ‘अभिनंदन’

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

भारतीय हवाई दलाचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासंदर्भातील एका बैठकीत पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमार जावेद बाजवा यांचे पाय थरथर कापत होते, त्यांना घाम फुटला होता असा दावा पाकिस्तानच्या संसदेत बुधवारी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्याने केला.

इस्लामाबाद : भारतीय हवाई दलाचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासंदर्भातील एका बैठकीत पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमार जावेद बाजवा यांचे पाय थरथर कापत होते, त्यांना घाम फुटला होता असा दावा पाकिस्तानच्या संसदेत बुधवारी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्याने केला.

सरदार अयाझ सादीक असे त्यांचे नाव असून ते पाकिस्तान मुस्लीम लिग-नवाझ पक्षाचे नेते आहेत. आधी ते संसदेचे सभापतीही होते. संसदेतील त्यांच्या भाषणाचा हवाल्यासह दुनिया न्यूजने हे वृत्त दिले. या वाहिनीला सादीक यांनी नंतर मुलाखतही दिली.त्यांनी बैठकीच्या तारखेचा उल्लेख नाही. मात्र पंतप्रधान इम्रान खान यांनी या बैठकीकडे पाठ फिरविली होती.

परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी त्यावेळी उपस्थित होते. अभिनंदन यांना सोडले नाही तर त्या रात्री नऊ वाजता भारत पाकिस्तानवर हल्ला करेल, त्यामुळे काहीही झाले तरी आपण त्यांना सोडून द्यायला हवे असे कुरेशी यांना सांगताच बाजवा यांच्या पाचावर धारण बसली. संसदीय नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली, ज्यास पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) आणि आपल्या पक्षाचे नेते उपस्थित होते, अशी सनसनाटी माहिती सादीक यांनी दिली आहे.

गेल्या वर्षी 26 फेब्रुवारी रोजी भारताने बालाकोट येथील जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हवाई हल्ले केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने प्रत्युत्तर दिले होते. त्यावेळी झालेल्या धुमश्चक्रीत अभिनंदन यांच्या मिग-21 बायसन विमानावर पाक सैनिकांनी सोडलेले क्षेपणास्त्र आदळले. अभिनंदन पॅराशूटच्या मदतीने विमानातून सुरक्षितपणे बाहेर पडले. ते पाकव्याप्त काश्मीरमधील होरन या गावात खाली उतरले. 60 तास ताब्यात ठेवल्यानंतर एक मार्चच्या रात्री त्यांची सुटका करण्यात आली होती.

सादीक यांचे मुद्दे
    सत्ताधारी मंडळी सरकार गांभीर्याने चालवीत नाहीत
    संसदेचे नियमही सत्ताधाऱ्यांना ठाऊक नाहीत
    काश्मीर, अभिनंदन यासह प्रत्येक विषयावर विरोधकांचा इम्रान सरकारला पाठिंबा, पण यापुढे साथ देणे योग्य ठरणार नाही.

वैयक्तिक टीका करायची नाही असा माझा प्रयत्न असतो, पण सत्ताधारी जेव्हा आम्हाला चोर किंवा मोदी का यार असे म्हणतात तेव्हा प्रत्युत्तर देणे भाग पडते.
- अयाझ सादीक

संबंधित बातम्या