कोरोनामुळे ब्रिटनच्या पंतप्रधानांचा भारत दौरा रद्द

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 19 एप्रिल 2021

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपला भारत दौरा रद्द केला आहे.

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडू लागला आहे. असं असताना ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपला भारत दौरा रद्द केला आहे. या आठवड्यामध्ये जॉन्सन भारत दौऱ्यावर येणार होते. मात्र वाढता कोरोनाचा विस्फोट पाहता त्यांनी नियोजित असणारा भारत दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. (Corona cancels British PMs visit to India)

बोरिस जॉन्सन यांनी दुसऱ्यांदा भारत दौऱ्यावर येण्याचं टाळलं आहे. यापूर्वी प्रजासत्ताक दिनी अथिती म्हणून ते भारतात येणार होते. मात्र तेव्हाही त्यांनी भारतात येण्याचं टाळलं होतं. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे हा निर्णय घेतल्याचं ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे बोरिस जॉन्सन यांच्या नियोजित भारत दौऱ्य़ावरुन ब्रिटनमध्ये जोरदार विरोध होत होता. ब्रिटनमधील विरोधी पक्षांनी जॉन्सन यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे.

इस्त्रायलने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्यावरील बंदी उठवली; जाणून घ्या

ब्रिटनमधील लेबर पार्टीने बोरिस जॉन्सन यांच्यावर टीकेचे तीक्ष्ण बाण सोडले आहेत. ब्रिटन सरकार नागरिकांना सांगत आहे की, ''गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडा, मात्र पंतप्रधान बोरिस जॉन्सन तसे करताना दिसत नाहीत. भारताबरोबर ते झूम मिटींगच्या माध्यमातून संवाद साधतात. या वेळेत सर्वजण हेच करत आहेत. पंतप्रधान जॉन्सन यांनी आपला भारत दौरा रद्द करुन नागरीकांना संदेश द्यायला हवा.'' असं लेबर पार्टीचे स्टीव रीड यांनी यावेळी सांगितलं होतं.

ब्रेक्झिटच्या निर्णयानंतर जॉन्सन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. तसंच पोस्ट ब्रेक्झिटनंतर कोणताही करार झाला नसल्याने ही भेट महत्त्वाची असणार होती. त्यामुळे या वर्षभरामध्ये बोरिस जॉन्सन आणि नरेंद्र मोदी यांची भेट होणार असल्याचं ब्रिटीश पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. तर ब्रिटनने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी-7 मध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं आहे. यात भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया या देशांना अथिती म्हणून निमंत्रण देण्यात आलं आहे.  
 

संबंधित बातम्या