दुसऱ्या वादविवादात कोरोना गाजला

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

अध्यक्षीय निवडणूक दहा दिवसांवर आली असताना झालेल्या दुसऱ्या आणि अंतिम थेट वादविवादात आज कोरोना, चीनशी जवळीक आणि अमेरिकेची ढासळती अर्थव्यवस्था हे मुद्दे गाजले. कोरोनाविरोधातील लस तयार असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला, तर सरकारकडे कोरोना संकटातून बाहेर येण्याची कोणतीही योजना नसल्याने देश काळोखात जाणार आहे, असा इशारा ज्यो बायडेन यांनी दिला. 

 

वॉशिंग्टन : अध्यक्षीय निवडणूक दहा दिवसांवर आली असताना झालेल्या दुसऱ्या आणि अंतिम थेट वादविवादात आज कोरोना, चीनशी जवळीक आणि अमेरिकेची ढासळती अर्थव्यवस्था हे मुद्दे गाजले. कोरोनाविरोधातील लस तयार असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला, तर सरकारकडे कोरोना संकटातून बाहेर येण्याची कोणतीही योजना नसल्याने देश काळोखात जाणार आहे, असा इशारा ज्यो बायडेन यांनी दिला. 

अध्यक्षीय निवडणुकीला दहा-बारा दिवस राहिलेले असताना प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. टेनेसी राज्यातील नॅशव्हीले येथे सुमारे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्यात ९० मिनिटे चर्चा झाली. पहिल्या वादविवादाच्या अनुभवावरुन शहाण्या झालेल्या चर्चा समितीने यावेळी प्रत्येक सत्राच्या सुरुवातीला एक वक्ता बोलत असताना दुसऱ्या वक्त्याचा माइक ‘म्यूट’ केला होता. यामुळे दोघांनाही त्यांचा मुद्दा मांडण्याची संधी मिळाली. अमेरिकेत कोरोनावरील लस तयार असून काही आठवड्यांतच त्याबाबत आपण घोषणा करू, असे ट्रम्प म्हणाले. देशातील काही कंपन्यांबरोबरच इतर काही देशांबरोबरही आम्ही यासाठी काम करत आहोत, असेही त्यांनी सांगितले. अमेरिकेचे आठ वर्षे उपाध्यक्ष सांभाळलेल्या ज्यो बायडेन यांनी ट्रम्प यांचे दावे फेटाळून लावतानाच या सरकारकडे कोणतीही योजना नसल्याचा दावा केला. लवकरच हिवाळा सुरु होऊन उपाययोजना न केल्यास अमेरिकेत काळे युग येईल, असा इशारा त्यांनी दिला. अमेरिकी पत्रकार क्रिस्टीन वेल्कर यांनी सूत्रसंचालन केले. आजच्या चर्चेत चीनशी मैत्रीचा विषयही गाजला.

संबंधित बातम्या