अफगाण चिमुरडीची जिगर

Afgan Girl
Afgan Girl

घझ्नी (अफगाणिस्तान)

आई-वडीलांना मारलेल्या दोन तालिबान दहशतवाद्यांना यमसदनास धाडलेली अफगाणिस्तानची कमार गूल नामक चिमुरडी कौतुकाचा विषय ठरली आहे. आपल्यावर हल्ला केल्यास इतर कोणत्याही दहशतवाद्याचा पुन्हा मुकाबला करण्यास सज्ज असल्याचे तिने सांगितले.
गेल्या आठवड्यात घोर या मध्य प्रांतातील टायवारा विभागातील एका दुर्गम खेड्यात गुलच्या घरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. तिच्या डोळ्यादेखत आधी आईला आणि मग वडीलांना घरातून ओढून काढत बाहेर नेऊन गोळ्या घालण्यात आल्या. मग दहशतवादी पुन्हा घरात घुसण्याच्या प्रयत्नात असतानाच गुलने एके-47 रायफल हातात घेऊन दोन दहशतवाद्यांचा खातमा केला.
ही घटना 16 जुलै रोजी घडली. चार दिवसांनी सरकारतर्फे माहिती देण्यात आली. आता गूल एका नातेवाईकाच्या घरी राहते. तिला संरक्षण पुरविण्यात आले आहे. हातात बंदूक घेतलेला तिचा फोटो व्हायरल झाला आहे.
‘एएफपी़ वृत्तसंस्थेला दूरध्वनीवर दिलेल्या मुलाखतीत गूलने त्या मध्यरात्री घडलेल्या भीषण प्रसंगाबद्दल सांगितले की, वीटा अन्् चिखलापासून बनविलेल्या भिंतींच्या घराचा दरवाजा मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कुणीतरी ठोठावत होते. थोड्याच वेळात दरवाजा तोडून दहशतवादी आत घुसले. आई त्यांना अडविणार तोच त्यांनी तिला बाहेर नेले. पाठोपाठ वडीलांनाही ओढून काढले. दोघांवर बेछूट गोळीबार करण्यात आला. मी भयंकर घाबरले होते, पण काही क्षणांत भीतीची जागा संतापाने घेतली. मी घरातील बंदूक हातात घेतली. दरवाजापाशी जाऊन दहशतवाद्यांवर गोळ्या झाडल्या. एक दहशतवादी गोळी झाडणार तोच माझा छोटा भाऊ पुढे सरसावला आणि त्याने माझ्याकडून बंदूक घेत गोळी झाडली. त्यामुळे तो दहशतवादी जखमी झाला. तो म्होरक्या असावा. त्यामुळे लगेच दहशतवाद्यांनी माघार घेतली. तोपर्यंत अनेक गावकरी आणि सरकारी सुरक्षा दलाचे जवानही दाखल झाले. त्यांच्याशी चकमक होऊन अखेर दहशतवादी पळून गेले.
दरम्यान, दहशतवादी मागे हटताच गूल आई-वडिलांपाशी गेली, पण तोपर्यंत त्यांचा श्वास थांबला होता. आई-वडिलांशी अंतिम क्षणी एकही शब्द बोलता आला नाही याचे तिला दुःख आहे, पण त्यांना मारलेल्या दहशतवाद्यांचा बळी घेतल्याचा तिला अभिमान वाटतो.

तालिबानचा इन्कार
टायवारा विभागात कारवाई झाल्याच्या वृत्तास तालिबान प्रवक्त्याने दुजोरा दिला, पण एका महिलेकडून कुणी दहशतवादी मारला गेल्याचा इन्कार केला.

हल्लेखोरांमध्ये पतीही सामील
न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार गुलचे वडील सरपंच तसेच सरकारचे समर्थक होते. सरकार तसेच सुरक्षा दलांना माहिती पुरविण्याचा संशय असलेल्या असंख्य नागरिकांना तालिबानकडून मारले जाते. गुलच्या बाबतीत कौटुंबिक कलह हे सुद्धा कारण होते आणि हल्लेखोरांमध्ये तिचा पतीही सामील होता. तिला बळजबरीने घेऊन जाण्यासाठी तो आल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

गूल आणि तिच्या भावाला अध्यक्ष अश्रफ घनी यांनी सुरक्षित स्थळी हलवावे. तिच्या नातेवाइकांच्या जिवाला धोका आहे.
- फौझिया कुफी, महिला हक्क कार्यकर्त्या, माजी खासदार

गुलची धाडसी कृती म्हणजे तमाम अफगाण महिलांच्यावतीने तालिबानला दिलेला इशाराच होय. त्यांच्या काळातील महिलांच्या तुलनेत आजच्या युगातील महिला वेगळ्या आहेत हे आता त्यांनी लक्षात घेतलेच पाहिजे.
- मुनेरा युसुफझादा, संरक्षण मंत्रालयाच्या अधिकारी

गुलचे खरोखरच संरक्षण करायचे असेल तर तिला परदेशात पाठवायला हवे. ती काबुलमध्ये दोन दिवस जरी राहिली तरी तिला मारले जाईल.
- झोया अमिनी, काबुलच्या रहिवासी

अध्यक्षांची शाबासकी
अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी गुलला शाबासकी दिली. कुटुंबावर हल्ला केलेल्या निर्दयी शत्रूविरुद्ध तिने सर्वस्व पणास लावून लढा दिला, असे त्यांनी म्हटले आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com