अमेरिकेत लशीचा मुहूर्त नोव्हेंबरचा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

ट्रम्प प्रशासनाकडून प्रांतांना सूचना, सुरक्षिततेबद्दल मात्र तज्ञांना चिंता

वॉशिंग्टन: कोरोनावरील लशीचे वितरण एक नोव्हेंबरपर्यंत होणार असून त्यासाठी सज्ज राहावे असा आदेश अमेरिकी सरकारने प्रांतांना दिला आहे. दरम्यान, लशीच्या सुरक्षिततेबद्दल आरोग्य तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

अमेरिकी रोग नियंत्रण आणि प्रतिबंध संस्थेचे संचाल रॉबर्ट रेडफिल्ड यांनी २७ ऑगस्ट रोजी गव्हर्नरना एक पत्र पाठविले आहे. संस्थेने लशीच्या वितरणासाठी मॅक्केसन कॉर्पोरेशनशी करार केला आहे. त्यानुसार त्यांचा परवाना अर्ज राज्यांना मिळेल. त्यावर त्वरेने कार्यवाही करावी. त्यानंतर प्रांतीय, स्थानिक आरोग्य खाते तसेच रुग्णालये येथे लशीचे वितरण होईल. तेथील सुविधा एक नोव्हेंबरपर्यंत सज्ज करण्यात येणारे संभाव्य अडथळे दूर करावेत. त्यासाठी एखादा नियम शिथिल करावा, पण त्यामुळे लशीच्या सुरक्षितता आणि परिणामकारकतेमध्ये कोणताही परिणाम होणार नाही.

सुरुवातीला लशीला अन्न आणि औषध प्रशासनाकडून मंजुरी मिळेल. अथवा आणीबाणीच्या अधिकाराखाली ही संस्था मान्यता देईल. लशीसाठी कोणत्या गटाला प्राधान्य द्यायचे हे आरोग्य अधिकाऱ्यांनी ठरवावे. लस देणारे अधिकारी निश्चित करावेत आणि  इतर कार्यवाही करावी असे या पत्रात नमूद करण्यात आले. लशीचे दोन डोस देण्यात येतील आणि त्यात एका महिन्याचे अंतर असेल. लस परिणामकारक ठरते आणि एक नोव्हेंबरपूर्वी ती सुरक्षित असेल का हे ठरविण्यासाठी पुरेशी आकडेवारी कशी मिळणार हा प्रश्न असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

लस परिणामकारक आणि सुरक्षित आहे का हे तपासण्यापूर्वीच आणीबाणीच्या अधिकाराचा वापर करून अन्न-औषध प्रशासन लशीला मान्यता देणार का याची मला चिंता आहे. लसीकरणाचा विषय अशा पद्धतीने हाताळला जात आहे की ते पाहून सार्वजनिक आरोग्याची काळजी संबंधितांना वाटत असावी असे वाटत नाही. हा एक स्टंटच आहे.-पीटर हॉटेझ, बेलॉर विद्यापीठाचे अधिष्ठाता

लस सुदृढ व्यक्तींना दिली जाते. अशावेळी संबंधितांवर सुरक्षिततेचा पुरावा सादर करण्याचे ओझे मोठे आहे. नोव्हेंबरचा प्रारंभ घाईचा वाटतो.
- आशिष झा, ब्राऊन विद्यापीठाचे अधिष्ठाता

संबंधित बातम्या