चीनच्या विरोधानंतरही चेक प्रजासत्ताकाचे शिष्टमंडळ तैवानमध्ये

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

संसदेचे अध्यक्ष मिलॉस विस्त्रचील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात प्रागचे महापौर झेडनेक ह्रीब यांचा समावेश आहे. सरकारी तसेच उद्योग, शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांचाही यात समावेश आहेत.

तैपेई: चीनच्या कडव्या विरोधानंतरही चेक प्रजासत्ताकाचे 80 सदस्यांचे जम्बो शिष्टमंडळ तैवान दौऱ्यावर रविवारी दाखल झाले. चीनने याबद्दल तीव्र टीका केली आहे.

संसदेचे अध्यक्ष मिलॉस विस्त्रचील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात प्रागचे महापौर झेडनेक ह्रीब यांचा समावेश आहे. सरकारी तसेच उद्योग, शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांचाही यात समावेश आहेत. राजनैतिकदृष्ट्या तैवान एकाकी पडावा यासाठी चीनचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यास शह देण्याच्या उद्देशाने चेकने हे दौरा आखला आहे.

ताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैवानचे परराष्ट्र मंत्री जोसेफ वू यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. चायना एअरलाईन्स या तैवानच्या कंपनीच्या विशेष विमानाने या प्रतिनिधींनी प्रवास केला.

गेल्याच आठवड्यात चीनचे परराष्ट्र प्रवक्ते झाओ लिजीयन यांनी या दौऱ्याचा निषेध केला होता. चेकने एकसंध चीन या तत्त्वाचे पालन करावे आणि तैवानबाबतचे विषय विवेकी आणि योग्य पद्धतीने हाताळावेत असे त्यांनी बजावले होते.

इशाऱ्यानंतरही दौरा
विस्त्रचील यांच्याआधी यारोस्लाव कुबेरा संसदेचे अध्यक्ष होते. त्यांनी हा दौरा आखला होता, त्यावेळी चीनचे समर्थक असलेले चेक प्रजासत्ताकाचे अध्यक्ष मिलॉस झीमान संतापले होते. कुबेरा यांचे जानेवारी निधन झाले. तैवानच्या अध्यक्ष त्साई इंग-वेन यांचे अभिनंदन करू नये असा इशारा चेक प्रजासत्ताकातील चिनी वकिलातीने दिला होता. चीनने अशा प्रकारे दबाव टाकल्यामुळेच हा दौरा आखण्यात आल्याचे विस्त्रचील यांनी ठामपणे सांगितले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या