मॉरिशसच्या समुद्रकिनाऱ्यावर १८ देवमासे मृतावस्थेत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

जपानी जहाजातील इंधनगळतीशी संबंध नाही

पोर्ट लुईस: मॉरिशसच्या समुद्रकिनाऱ्यावर किमान १८ देवमासे वाहून आले. यातील काही मृतावस्थेत होते, तर इतरांनी थोड्याच वेळात प्राण सोडला.

आग्नेयेकडील ग्रँड सेबल किनाऱ्यावर हे देवमासे भरकटले. काही देवमाशांना जखमा झाल्या होत्या. मॉरिशसचे मत्सोद्योग मंत्री सुधीर मौधू यांनी या महिन्याच्या प्रारंभी जपानी जहाजातून झालेल्या इंधनगळतीशी याचा संबंध असल्याची शक्यता फेटाळली. देवमाशांच्या शरीरावर किंवा त्यांच्या श्वसनसंस्थेत हायड्रोकार्बनचे अंश आढळले नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. 

देवमाशांचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया बुधवारी सायंकाळपर्यंत सुरू होती. पोट आणि फुप्फुसांच्या भागाचे विच्छेदन झाल्यानंतरच नेमके कारण समजेल असे मॉरिशस सागरी संवर्धन संस्थेचे ओवेन ग्रिफीथ यांनी सांगितले.

स्थानिक सरकारी अधिकारी प्रीतम दौमू यांनी सांगितले की, मृत देवमासे पाहून अनेक रहिवाशांना इंधनगळतीमुळे हे घडल्याची भिती वाटली होती. या किनाऱ्यापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर एक जहाज भरकटून एक हजार टनापेक्षा जास्त इंधनाची गळती झाली होती. त्यामुळे मॉरिशसच्या जैवसंपदेचे दिर्घकालीन नुकसान झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. जहाजाचा तुटलेला पुढील भाग सोमवारी समुद्रात बुडाला. 

संबंधित बातम्या