रिपब्लिकन पक्षातर्फे डोनाल्ड ट्रम्प यांनी उमेदवारी स्वीकारली

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

अमेरिकेत तीन नोव्हेंबरला अध्यक्षीय निवडणूक होत असून ट्रम्प यांचा सामना डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आणि देशाचे माजी उपाध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी होणार आहे.

वॉशिंग्टन: अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाने अध्यक्षीय निवडणूकीसाठी जाहीर केलेली उमेदवारी आज स्वीकार केली आहे. यामुळे ट्रम्प हे सलग दुसऱ्यांदा या पदासाठी लढत देणार आहेत. अमेरिकेत तीन नोव्हेंबरला अध्यक्षीय निवडणूक होत असून ट्रम्प यांचा सामना डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आणि देशाचे माजी उपाध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी होणार आहे.

तीन दिवसांपूर्वी उमेदवार म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव जाहीर झाल्यानंतर त्यांनी आज ‘व्हाइट हाऊस’ येथे उमेदवार स्वीकृतीचे भाषण केले. 

यावेळी समर्थकांशी बोलताना ते म्हणाले की,‘‘तुमच्या पाठिंब्याच्या बळावर अमेरिकेने चार वर्षांत फार चांगली प्रगती केली आहे. आपले भविष्यही उज्ज्वल असून आपण पुढील चार वर्षांत अमेरिकेची आणखी जोमाने उभारणी करू.’’ अध्यक्ष पदासाठीच्या उमेदवाराने ‘व्हाइट हाउस’मधून भाषण केल्याचे नजीकच्या काळात घडलेले नाही. आजच्या या कार्यक्रमाला १५०० निमंत्रित लोक होते.    

आम्हीच पहिल्या स्थानावर
कोरोना चाचण्यांच्या बाबतीत अमेरिकाच जगात पहिल्या क्रमांकावर असून भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला आहे. अमेरिकेने आतापर्यंत चार कोटींहून अधिक कोरोना चाचण्या केल्या आहेत. ‘अमेरिकेत कोरोनाबाधितांवर विविध प्रभावी पद्धतीने उपचार होत असून आता आम्ही प्लाझ्मा थेरेपीही सुरु केली आहे. योग्य उपचारांमुळे आम्ही लाखो लोकांचे जीव वाचविले असून मृत्यूचा दर वेगाने कमी झाला आहे, ’असा दावा ट्रम्प यांनी केला.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या