रिपब्लिकन पक्षालाही ट्रम्प नकोसे, पक्षातून हकालपट्टी करण्याबाबत एका सिनेटरचं विधान

PTI
सोमवार, 11 जानेवारी 2021

कॅपिटॉलमध्ये झालेल्या हिंसाचाराबद्दल अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार धरत डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते त्यांच्याविरोधात महाभियोग चालविण्याची तयारी करत असतानाच ट्रम्प हे त्यांच्या रिपब्लिकन पक्षालाही नकोसे झाले आहेत.

वॉशिंग्टन :  कॅपिटॉलमध्ये झालेल्या हिंसाचाराबद्दल अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार धरत डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते त्यांच्याविरोधात महाभियोग चालविण्याची तयारी करत असतानाच ट्रम्प हे त्यांच्या रिपब्लिकन पक्षालाही नकोसे झाले आहेत. ट्र्म्प समर्थकांनी केलेल्या दंगलप्रकरणात खुद्द ट्रम्प यांची भूमिका ही त्यांची हकालपट्टी करण्यास पुरेशी आहे, अशी टीका रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर पॅट टूमी यांनी केली आहे. 

ट्रम्प यांनी केलेला गुन्हा महाभियोगाला पात्र ठरणारा आहे, असे एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी पॅट टूमी म्हणाले. महाभियोगाचा ठराव मांडला गेल्यास त्याला पाठिंबा देणार की नाही, याबाबत त्यांनी मत व्यक्त केले नाही. कालही पक्षाच्या अलास्कामधील सिनेटर लिसा मुर्कोवस्की यांनी ट्रम्प यांच्या राजीनाम्याची जाहीररित्या मागणी केली होती.

पक्षाच्या नेत्या निकी हॅले यांनी ट्रम्प यांच्या झालेल्या चुकांचा काल पाढा वाचला होता. अमेरिकेत २०२४ मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी मिळण्याची हॅले यांना अपेक्षा आहे. रिपब्लिकन पक्षाच्या आणखीही काही नेत्यांनी ट्रम्प यांच्यावर जाहीरपणे टीका केली आहे. अमेरिकी काँग्रेसच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या सर्व सदस्यांना पत्र पाठवत ट्रम्प यांना हिंसाचारासाठी जबाबदार ठरविण्याचे आवाहन केले आहे. ट्रम्प यांच्याविरोधात आज महाभियोगाचा प्रस्ताव सादर होण्याची शक्यता आहे. हा ठराव सादर झाल्यास बुधवारी त्यावर मतदान होऊ शकते. 
 

अधिकाऱ्यांवर दबाव

जॉर्जियामधील निवडणूक अधिकारी टपालातील मतांची मोजणी करताना मतदारांच्या सह्या तपासून पहात होते, त्यावेळी ट्रम्प यांनी येथील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव आणत ‘गैरप्रकार’ शोधून काढण्यास सांगितले होते. असे केल्यास त्याला ‘नॅशनल हिरो’ बनविण्याची लालूचही ट्रम्प यांनी दाखविली होती, असा दावा ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने केला आहे. ट्रम्प यांनी जॉर्जियाचे मुख्य सचिव ब्रॅड रॅफेनस्पर्जर यांच्यावरही दबाव आणला होता. त्या आधी त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांनाही गैरप्रकार शोधण्यास सांगितले होते. जॉर्जियामध्ये टपालाद्वारे बनावट मते टाकली गेली असल्याचा ट्रम्प यांचा आरोप होता. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांना कोणताही गैरप्रकार आढळला नाही.

संबंधित बातम्या