डोनाल्ड ट्रम्प यांचेच चीनशी संबंध

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्यावर चीनधार्जिणेपणाचा आरोप करणारे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या दशकभरात चीनमधील अनेक प्रकल्प मिळविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आणि चार वर्षांच्या कारकिर्दीत चीनच्या अनेक सरकारी कंपन्यांबरोबर करार केले,

वॉशिंग्टन : डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्यावर चीनधार्जिणेपणाचा आरोप करणारे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या दशकभरात चीनमधील अनेक प्रकल्प मिळविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आणि चार वर्षांच्या कारकिर्दीत चीनच्या अनेक सरकारी कंपन्यांबरोबर करार केले, अशी माहिती ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने उघड केली आहे. यामुळे उद्या होणाऱ्या अध्यक्षीय चर्चेच्या दुसऱ्या फेरीत बायडेन यांच्या हाती एक नवेच शस्त्र लागले आहे. 

‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या करनोंदींनुसार त्यांचे अमेरिकावगळता ब्रिटन, आयर्लंड आणि चीन या तीन देशांमध्ये बँक खाते आहे. ही खाती त्यांच्या कंपन्यांच्या नावे असल्याने ट्रम्प यांच्या मालमत्तेमध्ये या खात्यांची नोंद नाही. ट्रम्प यांचे चीनमधील खाते ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेल्स मॅनेजमेंट एलएलसी या कंपनीद्वारे हाताळले जाते. नोंदींनुसार, याद्वारे २०१३ ते २०१५ या कालावधीत चीनमध्ये १,८८,५६१ डॉलरचा कर भरला गेला आहे. मात्र, २०१५ नंतर चीनमध्ये कोणतेही व्यवहार झाले नसून त्याआधी केवळ व्यवसाय करण्याची संधी म्हणून हे खाते उघडले होते, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांच्या वकीलांनी दिली आहे. 

ट्रम्प यांचे बायडेन यांच्यावरील आरोप आणि आजचा हा खुलासा यामुळे अमेरिकेतील सर्वांत मोठ्या निवडणुकीत चीनचा मुद्दा गाजत असल्याचे दिसत आहे. ट्रम्प हे बायडेन यांच्यावर चीनधार्जिणेपणाचा आरोप करत असले तरी बायडेन यांचे चीनमध्ये कोणतेही व्यावसायिक अथवा वैयक्तिक संबंध नसल्याचे दिसत आहे, तर ट्रम्प यांनी मात्र चीनमध्ये व्यवसाय सुरु करण्यासाठी अनेक प्रयत्न केल्याचे पुरावे आहेत. त्यांनी विविध व्यवसाय करण्यासाठी मागितलेल्या अनेक परवान्यांना ते अध्यक्ष झाल्यावर मान्यता मिळाल्याचे दिसून येत आहे. ट्रम्प यांनी रशियामध्ये हॉटेलसाखळी सुरु करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

संबंधित बातम्या