डोनाल्ड ट्रम्प यांना लशीची घाई

पीटीआय
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

अमेरिकेमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे ढोल वाजू लागल्याने विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनावरील लस आणण्याची घाई झाली आहे.

वॉशिंग्टन: अमेरिकेमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे ढोल वाजू लागल्याने विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनावरील लस आणण्याची घाई झाली आहे. यासाठी ट्रम्प हे अगदी आरोग्य संशोधक आणि तज्ज्ञांची मते देखील फेटाळून लावत असल्याने आता त्यांनाच टीकेला सामोरे जावे लागत आहे. कोरोनावर ऑक्टोबरमध्ये लस आणण्याचे विधान करून ट्रम्प यांनी पुन्हा स्वतःचीच कोंडी करून घेतली.

अमेरिकेच्या आरोग्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या संस्थेच्या प्रमुखांनी नुकतेच कोरोनाविरोधातील लढाईमध्ये मास्क हेच सर्वांत मोठे शस्त्र ठरणार असून २०२१ च्या उन्हाळ्यापर्यंत तरी कोरोनावर लस तयार होणे शक्य नसल्याचे म्हटले होते. यावर माध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी सीडीसीच्या प्रमुखांचे म्हणणे फेटाळून लावले

लस मोफत देण्याची योजना
ट्रम्प प्रशासनाने कोरोनाची लस नागरिकांना मोफत देण्याची योजना आखली आहे. अमेरिकी आरोग्य आणि मानवी सेवा विभाग तसेच संरक्षण विभागाने संयुक्तपणे या योजनेसंदर्भातील निवेदन जारी केले. विज्ञान आणि डेटाच्या मदतीने लस तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि हे अमेरिकी नागरिकांनी जाणून घ्यावे, असे आरोग्य विभागाने नमूद केले. सुरुवातीस लस मर्यादित स्वरूपात मिळणार आहे.

मास्कपेक्षा लस अधिक प्रभावी
कोविड-१९ वरची लस ही फेसमास्कपेक्षा ७० टक्के अधिक सुरक्षा प्रदान करते, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी मत मांडले आहे. जर माझी प्रतिकारशक्ती लशीपासून वाढत नसेल तर ती लस माझे संरक्षण करू शकणार नाही. मग हे काम मास्क करेल, असेही त्यांनी नमूद केले. अनेकांना मास्क घालण्याची संकल्पना आवडत नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 
अध्यक्ष ट्रम्प यांनी कोविडच्या सुरवातीच्या काळात मास्क घालणे टाळले होते. परंतु कालांतराने मास्क घातल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. आता ट्रम्प यांनी लशीचीच बाजू उचलून धरली.

वर्षअखेरीस १० कोटी नागरिकांचे लसीकरण शक्य
सध्या आघाडीचे देश लसनिर्मितीत गुंतले असताना अमेरिकेने मात्र येत्या ऑक्टोबरमध्ये कोरोना लसीकरण मोहीम राबविण्याची शक्यता व्यक्त केली. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षअखेरीस सुमारे १० कोटी नागरिकांचे लसीकरण होऊ शकते, असे म्हटले आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प म्हणाले की, देशात अत्यंत सुरक्षित आणि प्रभावीपणे लशींचे वितरण करण्यासाठी तयारी केली जात आहे. 

संबंधित बातम्या