डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘चीन राग’

पीटीआय
रविवार, 27 सप्टेंबर 2020

कोरोनाचा विषाणू चीनमधून आला हे विसरण्याजोगे नाही

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनवरची नाराजी उघड केली आहे. अमेरिकेत पुन्हा सत्तेत आलो तर चीनवरची अवलंबिता संपवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोरोना संसर्ग संपल्यानंतर दोन्ही देशातील संबंध पूर्वीसारखे राहतील, असे वाटत नाही. 

कारण कोरोना संसर्गाचा विषाणू हा चीनमधून आला आहे, हे आपण विसरू शकत नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.न्यू पोर्ट व्हर्जिनिया येथे शुक्रवारी आयोजित प्रचार सभेत ट्रम्प बोलत होते. ते म्हणाले, की अमेरिकेची अर्थव्यवस्था चांगली वाटचाल करत होती. परंतु चीनमधून आलेल्या विषाणूने सर्व काही उध्वस्त केले आहे. असे घडायला नको होते. ही बाब आपण कधीही विसरू शकत नाही. आपण सीमा बंद केल्या. लोकांचे जीव वाचवले. आता पुन्हा नव्याने उभारी घेत आहोत. संसर्गाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत असून आतापर्यंत २ लाखाहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. देशाची अर्थव्यवस्था देखील बिकट झाली आहे. परिणामी लाखो नागरिकांनी रोजगार गमावला आहे. अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा जिंकून आलो तर येत्या चार वर्षात अमेरिकेला सुपरपॉवर देश करु, असे आश्‍वासन त्यांनी नागरिकांना दिले. चीनवरचे अवलंबित्व कायमस्वरुपी संपुष्टात आणू असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ट्रम्प यांनी यापूर्वीही यूएनच्या सभेत कोरोना संसर्गाच्या प्रसाराला चीनला जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.

संबंधित बातम्या