संभ्रम निर्माण करू नका

PTI
बुधवार, 15 जुलै 2020

'डब्लूएचओ'चे जागतिक नेत्यांना आवाहन

जीनिव्हा

कोरोना संसर्गाबाबत संभ्रमित करणारी विधाने करून जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देत असल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे सरचिटणीस टेड्रॉस घेब्रेयेसस यांनी काही देशांच्या नेत्यांवर टीका केली आहे. या देशांनी संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी गंभीर प्रयत्न केले नाहीत तर नजीकच्या भविष्यात परिस्थिती सर्वसामान्य होण्याची आशा बाळगू नका, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कोरोनाग्रस्तांच्या संख्येचा दररोज उच्चांक गाठला जात असल्यावरून घेब्रेयेसस यांनी पत्रकारांशी संवाद साधत जागतिक नेत्यांवर टीका केली. यावेळी त्यांनी कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नाही. ते म्हणाले,''कोरोनाविरुद्धच्या लढाईत अनेक देश चुकीच्या मार्गांवरून जात आहेत. काही देश योग्य उपाय योजना करण्यात कमी पडत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर मोठा परिणाम होतो आहे. हा विषाणू सर्व जगाचा क्रमांक एकचा शत्रू बनला आहे. तरीही अनेक देश आणि तेथील जनतेला याचे गांभीर्य वाटत नाही.''
अनेक नेते राजकीय फायदा उठवण्याच्या प्रयत्नांत लोकांच्या विश्वासाला तडा देत असल्याचे निरीक्षण घेब्रेयेसस यांनी नोंदविले आहे. कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करता शाळा सुरू करणे, सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची कडक अंमलबजावणी न करणे, संसर्ग वाढत असतानाही सर्व व्यवहार सुरू करण्यास परवानगी देणे हा बेजबाबदारपणा असल्याचे ते म्हणाले. मास्क वापरणे, हात वारंवार धुणे, लक्षणे आढळल्यास घरीच थांबणे अशा सूचना जनतेला सातत्याने आणि स्पष्टपणे देणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. ब्रिटनमध्ये लॉकडाउन उठवताना मास्क वापरण्याबाबत संभ्रम निर्माण झाल्यानंतर सरकारला त्याबाबत पुन्हा आदेश काढावा लागला होता.
अमेरिका, ब्राझील, भारत या देशांमध्ये संसर्ग वेगाने वाढत असतानाही शास्त्रज्ञांनी दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल घेब्रेयेसस यांनी नाराजी व्यक्त केली. अनेक नेते तर तज्ज्ञांच्या प्रत्येक सुचनेवर संशय घेत जनतेची दिशाभूल करतात, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

निम्मे रुग्ण अमेरिका, ब्राझीलमधील
जगभरातील रुग्णसंख्येच्या विश्लेषणानुसार, सध्या दररोज नव्याने सापडणाऱ्या दोन लाख ३० हजार रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण हे केवळ दहा देशांमधील आहेत. अर्ध्याहून अधिक नवे रुग्ण केवळ अमेरिका आणि ब्राझीलमधील आहेत. लोकांनी आणि सरकारांनी परिस्थितीचे भान राखून वर्तन करायला हवे, अशी अपेक्षा टेड्रॉस घेब्रेयेसस यांनी व्यक्त केली आहे.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या