डॉ. हर्ष वर्धन यांनी ऑस्ट्रेलियाच्या आरोग्यमंत्र्यांबरोबर केली चर्चा

pib
बुधवार, 15 जुलै 2020

संकटाचे संधीत रूपांतर- डॉ. हर्ष वर्धन यांनी ऑस्ट्रेलियाच्या आरोग्यमंत्र्यांबरोबर कोविड-19 व्यवस्थापनासह द्विपक्षीय आरोग्य सहकार्याबाबत केली चर्चा

नवी दिल्ली, 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज ऑस्ट्रेलियाचे आरोग्य मंत्री ग्रेगरी अँड्रयू हंट यांच्याबरोबर द्विपक्षीय आरोग्य सहकार्याबाबत चर्चा करण्यासाठी डिजिटल संवाद साधला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी 10 एप्रिल 2017 रोजी आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारात मलेरिया आणि क्षयरोग सारख्या संसर्गजन्य रोगाचे व्यवस्थापन, मानसिक आरोग्य आणि असंसर्गजन्य रोग, प्रतिजैविक प्रतिकारशक्ती, औषधे, लस आणि वैद्यकीय उपकरणे यांचे नियमन, तसेच आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे डिजिटायझेशन या परस्पर हित क्षेत्रांचा समावेश आहे. या सामंजस्य करारात सध्याच्या कोविड महामारी सारख्या सार्वजनिक आरोग्य आणीबाणीला प्रतिसाद देखील समाविष्ट आहे.

सुरुवातीला डॉ हर्षवर्धन यांनी ऑटिझम ग्रस्त मुलांसाठी 5 किमी दौड सारख्या धर्मादाय कार्यक्रमांचे आयोजन आणि किशोरवयीन मुलांमधील मधुमेहाबाबत जागरूकता निर्माण केल्याबद्दल ग्रेगरी हंट यांच्या संस्थेची प्रशंसा केली. एकत्र काम करण्याच्या गरजेबाबत बोलताना डॉ हर्ष वर्धन यांनी नमूद केले, की “ऑस्ट्रेलियामध्ये विकसित आरोग्य यंत्रणा जगातील सर्वोत्तम आरोग्य यंत्रणापैकी एक आहे. पुढील 10 वर्षांत भारतातील आरोग्य सेवा हे सर्वाधिक वेगाने वाढणारे क्षेत्र असून 275 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करेल. भारताची देशांतर्गत मागणी जागतिक अर्थव्यवस्थेतील कोणत्याही संकटाची पर्वा न करता या वाढीला चालना देईल अशी अपेक्षा आहे. संशोधन आणि विकास तसेच वैद्यकीय पर्यटनामध्येही भारत विपुल संधी उपलब्ध करुन देत आहे.” आयुर्वेद आणि योगासारख्या भारतातील पारंपारिक सर्वांगीण वैद्यकीय प्रणाली ऑस्ट्रेलियाला लठ्ठपणा आणि संबंधित आजारांना प्रतिबंध करण्यास मदत करू शकतात, असे ते पुढे म्हणाले.

डॉ हर्षवर्धन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘आरोग्य ही एक सामाजिक चळवळ’ दृष्टिकोन विशद केला. “भारताची सार्वत्रिक आरोग्य सेवा योजना (आयुष्मान भारत) अंतर्गत 10 कोटी कुटुंबांना सामावून घेण्यात आले आहे. गेल्या वर्षी 1 कोटी लोकांना याचा फायदा झाला. 2025 पर्यंत क्षयरोग निर्मूलनासाठी भारत कटिबद्ध आहे. अति तणाव; स्तन, फुफ्फुस, घसा आणि तोंड इत्यादींचा कर्करोग सारख्या असंसर्गजन्य रोगांच्या मोठ्या प्रमाणावर तपासणीसाठीही भारताने प्रयत्न केले आहेत; आरोग्य क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि शेवटच्या नागरिकापर्यंत सेवा सुरळीत पोहचविण्यास सक्षम करण्यासाठी ‘डिजिटल हेल्थ ब्ल्यू प्रिंट’ची अंमलबजावणी करण्यात देखील भारताने प्रगती केली आहे; कर्करोग आणि हृदयरक्तवहिन्यासंबंधी आजारांवर आणि ‘कार्डियाक इम्प्लांट्स’वर उपचारासाठी परवडणारी औषधे (उपचारांसाठी किफायतशीर औषधे आणि विश्वसनीय इम्प्लांट्स-AMRIT) कार्यक्रमांतर्गत गरीबांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. पंतप्रधानांचा “संपूर्ण सरकार” दृष्टीकोनाने 400 दशलक्ष लोकांच्या आर्थिक सहभागास सक्षम केले आणि त्यांच्यापर्यंत आरोग्यसेवा पोहचवल्या.

आंतरराष्ट्रीय समुदायात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेल्या विश्वासाचा, हंट यांनी उल्लेख केला. ऑस्ट्रेलियाच्या ‘युनिव्हर्सल टेलिमेडिसिन’ने आतापर्यंत 19 दशलक्ष रुग्ण बरे करण्यात मदत केली, असे त्यांनी नमूद केले. सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयांमार्फत आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणे आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांवरील दृष्टिकोन, हे अनुकरण करण्याजोगे मॉडेल असल्याचे ते म्हणाले. जगभरात 60% स्वस्त जेनेरिक औषधांच्या पुरवठ्यात भारताची मोठी भूमिका असल्याची त्यांनी दखल घेतली. तसेच ‘जेनोमिक्स’ आणि ‘स्टेम सेल’ तंत्रज्ञानाचा वापर करून दुर्मिळ आजारांसाठी नवीन औषधांच्या संशोधनात भारत ऑस्ट्रेलियाला कशी मदत करू शकेल, हे त्यांनी विस्तारपूर्वक सांगितले.

महामारीवर नियंत्रण आणि व्यवस्थापनात भारताच्या वैद्यकीय समुदायाच्या भूमिकेबद्दल सविस्तर माहिती देताना डॉ हर्ष वर्धन यांनी नमूद केले की कोविड-19 रोखण्यात भारताचे वैद्यकीय व्यावसायिक, निमवैद्यकीय आणि वैज्ञानिक यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ते म्हणाले, की ते औषध संशोधनात आणि विद्यमान औषधांच्या पुनर्वापरात मदत करत आहेत. महामारीच्या सुरुवातीलाच त्यांनी या विषाणूला अटकाव केला आणि ‘जेनोम सिक्वेंसींग’चा वापर करून विषाणूचा अभ्यास करण्यात ते गुंतले आहेत. जानेवारी 2020, मध्ये भारतात या विषाणूची तपासणी करण्यासाठी फक्त एक प्रयोगशाळा होती, आता देशभरात 1200 हून अधिक प्रयोगशाळांमध्ये तपासणी करण्यात येत आहे. भारताच्या औषध उत्पादकांनी 140 देशांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन पुरवठा करण्यास भारताला सक्षम केले आहे.”

संपादन - तेजश्री कुंभार 

संबंधित बातम्या