श्रीलंकेत एका कारागृहात झालेल्या हिंसाचारात ८ कैदी ठार

PTI
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथून जवळच असलेल्या एका कारागृहात रविवारी झालेल्या हिंसाचारात किमान आठ कैद्यांचा मृत्यू झाला तर ३७ जण जखमी झाले.

कोलंबो : श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथून जवळच असलेल्या एका कारागृहात रविवारी झालेल्या हिंसाचारात किमान आठ कैद्यांचा मृत्यू झाला तर ३७ जण जखमी झाले. कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी या कैद्यांनी कारागृहाचे प्रवेशद्वार तोडून पळण्याचा प्रयत्न केला असता अधिकाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा बळाचा वापर केला. त्यामुळे चिडलेल्या कैद्यांनी संघर्ष केल्याने हिंसाचार भडकला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

कोलंबोच्या उत्तर भागात १५ किलोमीटर अंतरावर महारा कारागृह असून कैद्यांनी तेथे धुमाकूळ घातला होता. परिणामी तुरुंग अधिकाऱ्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावले उचलली. सध्या श्रीलंकेतील गर्दीच्या तुरुंगात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे कैद्यांत अस्वस्थता पसरली आहे. काही दिवसांपूर्वीच कैद्यांनी अनेक तुरुंगात आंदोलन केले होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल कैद्यांच्या एका गटाने कारागृहाचे प्रवेशद्वार उघडण्याचा आणि तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर केला. या हिंसाचारात दोन तुरुंग अधिकाऱ्यांसह २७ जण जखमी झाले. तुरुंगाच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सांगितले की, कारागृहात आग लागल्याने परिसरात प्रचंड धूर झाला. दंगेखोर कैद्यांना स्वयंपाक घर आणि रेकॉर्ड रूमला आग लावली. काही कैद्यांनी अधिकाऱ्यांना ओलिस ठेवण्याचा देखील प्रयत्न केला. कोरोना संसर्गामुळे धास्तावलेल्या कैद्यांनी आपल्याला अन्य ठिकाणी हलवावे अशी मागणी केली होती. कारण महारा तुरुंगात १७५ हून अधिक कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय तुरुंगातील कैद्यांशी संपर्क आल्याने एक हजाराहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यातही हिंसाचार उसळला होता. त्यात कैदी मारला गेला होता. तसेच मार्च महिन्यांतही एका कैद्याचा मृत्यू झाला होता. 
 

क्षमता १० हजाराची; कैदी २६ हजार

श्रीलंकेतील तुरुंग सध्या कैद्यांनी भरलेले आहेत. 
१० हजाराची क्षमता असताना २६ हजार कैद्यांना डांबून ठेवण्यात आले आहे. श्रीलंकेत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व्यापक प्रयत्न केले जात आहेत. तेथे २२,९८८ रुग्ण आढळून आले असून १०९ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

अधिक वाचा :

इंडोनेशियामधील इले लेवोटोलोक ज्वालामुखी झाला जागृत 

दहशतवादी संघटना बोको हरामकडून नायजेरियात ४० शेतकऱ्यांची हत्या

दक्षिण कोरियात कोरोनाची तिसरी लाट ; निर्बंध आणखी कडक होणार 

संबंधित बातम्या