क्वारंटाइनसाठी सिंगापूरला इलेक्ट्रॉनिक टॅगची पद्धत

अवित बगळे
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

हे उपकरण 11 ऑगस्टपासून तेथून येणाऱ्यांना दिले जाईल. सरकारी केंद्राऐवजी घरीच त्यांचे विलगीकरण केले जाईल.

सिंगापूर

इतर काही देशांतून येणाऱ्या काही प्रवाशांच्या क्वारंटाइनवर देखरेख ठेवण्यासाठी सिंगापूरमध्ये इलेक्ट्रॉनिक टॅगची पद्धत सुरु करण्यात येईल. या देशांची यादी लवकरच जाहीर करण्यात येईल.
हे उपकरण 11 ऑगस्टपासून तेथून येणाऱ्यांना दिले जाईल. सरकारी केंद्राऐवजी घरीच त्यांचे विलगीकरण केले जाईल. जीपीएस आणि ब्लूटूथ सिग्नलवर चालणाऱ्या उपकरणासाठी संदेश पाठविण्यात येतील. त्यास प्रतिसाद देणे अनिवार्य असेल. घरातून बाहेर पडल्यास किंवा उपकरणात फेरफार केल्यास सरकारी संस्थेला धोक्याचा इशारा मिळेल.
ही पद्धत हाँगकाँग आणि दक्षिण कोरियात वापरली जात आहे. हाँगकाँगमध्ये मनगटाला इलेक्ट्रॉनिक पट्टी बांधली जाते. दक्षिण कोरियात हे उपकरण स्मार्टफोनला जोडले जाते.
हे उपकरण कसे असेल हे सिंगापूरने अद्याप जाहीर केलेले नाही, मात्र त्यात आवाज किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा नसेल तसेच कोणतीही वैयक्तिक माहिती साठविण्याची सोय नसेल असे स्पष्ट करण्यात आले. 12 वर्षांखालील व्यक्तींसाठी ते देण्यात येणार नाही.

...तर कारावास किंवा दंड
संसर्गजन्य विकार कायद्यानुसार निर्बंधांचा भंग केल्यास सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा दहा हजार सिंगापूर डॉलर (7272 अमेरिकी डॉलर, पाच लाख 47 हजार 337 रुपये 99 पैसे) दंड अशी तरतूद आहे. याच नियमानुसार परदेशी नागरिकांचा कामाचा परवानाही रद्द करण्यात आला आहे.

 

संबंधित बातम्या