'चिल डोनाल्ड चिल'...; ट्रम्प यांची उडवली खिल्ली

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्वीट करत 'स्टॉप द काऊंट' म्हटले होते. याला उत्तर देत पर्यावरण प्रेमी ग्रेटा थनबर्ग हिने डोनाल्ड ट्रम्प यांच्याच जुन्या ट्वीटचा आधार घेत ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

वॉशिंग्टन- अमेरिकेचा राष्ट्रपती कोण होईल, हे जाणून घेण्याची उत्सुकता सामान्यांपासून ते अत्यंत उच्च वर्गाला सुद्धा लागलेली आहे. अमेरिकेत अद्यापपर्यंत झालेल्या मतामोजणीत सत्तापालट होण्याचीच जास्त चिन्हे दिसत आहेत. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता जाणार असे दिसत असताना नेहमीप्रमाणे त्यांनी आपला राग व्यक्त करत मतमोजणीलाच आव्हान दिले. एकामागून एक ट्वीट करत त्यांनी ट्वीटरलाही संकटात टाकले. शेवटी ट्वीटरलाच त्यांचे तर्कशुन्य आणि खोटे ट्वीट लपवून ठेवावे लागण्याची वेळ आली. अशात त्यांनी एक ट्वीट करत म्हटले होते, 'स्टॉप द काऊंट'. याला उत्तर पर्यावरण प्रेमी ग्रेटा थनबर्ग हिने डोनाल्ड ट्रम्प यांनी तिच्यासाठी टाकलेल्या ट्वीटमधील मजकूर घेत ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

 डोनाल्ड यांनी 2019मध्ये केलेल्या ट्वीटला री-ट्वीट करत तिने म्हटले आहे की, 'हे किती हास्यास्पद आहे. डोनाल्डनी आधी त्यांच्या रागावर नियंत्रण मिळवलं पाहिजे आणि नंतर आपल्या मित्राबरोबर जुन्या काळातील एखादी सिनेमा बघायला जावे. चिल डोनाल्ड चिल'. या ट्वीटमधून ग्रेटाने काढलेल्या खोडीची सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. ग्रेटा आणि ट्रम्प यांच्यात या आधीही अनेकदा वाद झालेले आहेत. मात्र, यावेळी ग्रेटाने जोरदार प्रत्युत्तर देत डोनाल्ड यांची चेष्टा केली आहे. विशेष म्हणजे डोनाल्ड यांची चेष्टा करताना ग्रेटाने त्यांचीच भाषा वापरली आहे.      
डोनाल्ड यांनी ग्रेटाबद्दल काय ट्वीट केले होते?

२०१९मध्ये ग्रेटाला 'टाईम पर्सन ऑफ इयर' या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले होते. त्यावेळी ट्रम्प यांनी ट्वीट करताना म्हटले होते की, 'हे किती हास्यास्पद आहे. ग्रेटाने आधी तिच्या रागावर नियंत्रण मिळवलं पाहिजे आणि नंतर आपल्या मित्राबरोबर जुन्या काळातील एखादा सिनेमा बघायला जावे. चिल ग्रेटा चिल'. 

ट्रम्प यांच्या या ट्वीटनंतर ग्रेटाने आपले ट्वीटर बायो बदलून टाकले होते. ग्रेटाने तेव्हा आपल्या ट्वीटर बायोत लिहिले होते की, 'टीन एजर, जी आपल्या रागावर नियंत्रण मिळवायला शिकत आहे आणि सध्यातरी आपल्या मित्रासोबत जुन्या काळातला सिनेमा बघत चिल करत आहे. ग्रेटाचे पर्यावरणाच्या प्रश्नांवर अनेक देशाच्या प्रमुखांशी याआधीही वाजले आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोलसेनारो यांच्याबरोबरही ग्रेटाचे अशाच पद्धतीचे भांडण झाले होते.   

 

संबंधित बातम्या