अमेरिका- चीन तणाव कमी करण्यास युरोपीय देशांची भूमिका महत्वाची: वँग यी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

2020 मध्ये सकारात्मक आर्थिक विकास साध्य केलेल्या फार कमी देशांत चीनचा समावेश असल्यामुळे जगाला कोरोनाच्या जागतिक साथीतून सावरण्यास चीन मदत करेल असे आश्वासनही त्यांनी दिले. - वँग यी, चीनचे परराष्ट्र मंत्री

पॅरिस (फ्रान्स): अमेरिका आणि चीन यांच्यात निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी फ्रान्स आणि इतर युरोपीय देश भूमिका बजावू शकतील, अशी आशा चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी रविवारी व्यक्त केली.

वँग युरोप दौऱ्यावर आले असून त्यांनी आज आंतरराष्ट्रीय संबंधांवरील फ्रेंच संस्थेच्या परिषदेत भाषण केले. त्यानंतर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, अमेरिकेशी चर्चेचे दरवाजे नेहमीच खुले असतात. गांभीर्याने चर्चा केल्यास सहमतीचा तोडगा निघू शकेल असा विश्वास वाटतो.

अमेरिकेतील काही जहाल गट चीनला रोखण्याचा आणि पक्षपाती विचारसरणीच्या जोरावर संघर्ष घडविण्याचा प्रयत्न करतात असा दावा करून वँग पुढे म्हणाले की, चीनने शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक प्रगतीसाठी सातत्यपूर्ण भूमिका घेतली आहे. जग अभूतपूर्व अशा संकटांना सामोरे जात असताना जास्त स्थैर्य निर्माण होण्यासाठी युरोपबरोबरील संबंध अधिक भक्कम करावेत असे आवाहनही त्यांनी केले. अशा संकटसमयी आंतरराष्ट्रीय समुदायात चीनला प्राधान्याचे धोरण कदापि रेटणार नाही, असा दावाही त्यांनी केला. 

ढवळाढवळ नको
दरम्यान, शीनजियांग आणि हाँगकाँग येथे जे काही घडत आहे तो चीनचा अंतर्गत मामला आहे. इतर देशांनी त्यात ढवळाढवळ करू नये, असेही वँग यांनी बजावले. फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन-यीवेस ले ड्रीयन यांनी वँग यांची भेट घेतली. त्यावेळी या भागातील मानवी हक्कांच्या खालावणाऱ्या स्थितीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली होती. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या