रशियावर नव्याने निर्बंध लादण्याबाबत युरोपीय महासंघ करणार चर्चा

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 26 जानेवारी 2021

राजकीय विरोधक अॅलेक्सी नवाल्नी यांच्या सुटकेच्या मागणी करणाऱ्या निदर्शकांना अटक झाल्यामुळे रशियावर नव्याने निर्बंध लादण्याबाबत युरोपीय महासंघ सोमवारच्या बैठकीत चर्चा करणार आहे.

ब्रुसेल्स: राजकीय विरोधक अॅलेक्सी नवाल्नी यांच्या सुटकेच्या मागणी करणाऱ्या निदर्शकांना अटक झाल्यामुळे रशियावर नव्याने निर्बंध लादण्याबाबत युरोपीय महासंघ सोमवारच्या बैठकीत चर्चा करणार आहे. रशियाने याप्रकरणी आक्रमक भूमिका कायम ठेवली असून शनिवारी सुमारे तीन हजार निदर्शकांना अटक करण्यात आली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी जवळीक असलेल्या काही अधिकाऱ्यांवर यापूर्वीच निर्बंध लादण्यात आले आहेत.
महासंघातील 27 देशांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यासाठी आगमन झाल्यानंतर लिथुएनियाचे परराष्ट्र मंत्री गॅब्रीएलीयूस लँड््सबेर्जीस यांनी व्हिडिओद्वारे निवेदन जारी केले. ते म्हणाले की, रशियात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अशावेळी युरोपने त्यासाठी पाठिंबा दिलाच पाहिजे. निदर्शकांना जेरबंद करण्यासारखे प्रकार कदापी मान्य केले जाणार नाहीत असा अत्यंत स्पष्ट आणि निर्णायक संदेश आपण देण्याची गरज आहे.
रशियाने 2014 मध्ये क्रिमीया द्वीपकल्प बळकावला. त्यामुळे ऊर्जा, अर्थ आणि शस्त्रास्त्रे अशा क्षेत्रांत युरोपने यापूर्वीच आर्थिक निर्बंध लादले.

विविध देशांचा पाठिंबा  
बाल्टीक समूहातील लॅट्विया आणि इस्टोनिया या देशांनी आणखी कारवाईला पाठिंबा दिला आहे. रुमानियाकडूनही नुकताच पाठिंबा जाहीर करण्यात आला. फिनलंडनचे परराष्ट्र मंत्री पेक्का हाविस्तो यांनी विषबाधेप्रकरणी रीतसर कायदेशीर चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. इटलीचे परराष्ट्र मंत्री लुईजी डी मैयो यांनी प्रवासाचे निर्बंध आणि मालमत्ता गोठविणे अशा कारवाईला पाठिंबा दिला आहे. जर्मनीचे परराष्ट्र मंत्री हैको मास यांनी सांगितले की, नवाल्नी यांच्यासाठी कडाक्याच्या थंडीचा धैर्याने सामना केलेल्या निदर्शकांची तातडीने सुटका व्हावी. त्यांनी आणखी भाष्य मात्र केले नाही. नवाल्नी यांच्यावर जर्मनीतच उपचार करण्यात आले होते.

संबंधित बातम्या