फेसबुकने केली फोन कॅमेऱ्यातून डेटाचोरी

पीटीआय
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

सॅन फ्रान्सिस्को कोर्टात याचिका; हेरगिरीसाठी इन्स्टाग्रामचा वापर केल्याचा आरोप

सॅन फ्रान्सिस्को: लोकप्रिय सोशल मीडिया फेसबुकवर इन्स्टाग्राममार्फत डेटा चोरल्याचा आरोप करण्यात आला असून, युजरचा खासगी डेटा चोरण्यासाठी फोन कॅमेऱ्याचा वापर केल्याचे म्हटले आहे. याबाबत सॅन फ्रान्सिस्कोच्या फेडरल न्यायालयात न्यू जर्सीच्या इन्स्टाग्राम युजर ब्रिटनी कॉन्डिंटी यांनी याचिका दाखल केली आहे. फेसबुकने मात्र हा आरोप फेटाळला असून, एका बगमुळे हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे. 

काल रात्री फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे सर्व्हर डाउन झाल्यामुळे जगभरातील हजारो युजर या प्लॅटफॉर्मवर लॉगइन करू शकले नाही. याबाबत युजरनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला. यादरम्यान फेसबुकने इन्स्टाग्रामच्या युजरची कथित रूपाने हेरगिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. युजरचा डेटा चोरण्यासाठी फोन कॅमेऱ्याचा वापर केल्याचे म्हटले आहे. याबाबत याचिका दाखल आहे. एका वृत्तानुसार, आयफोन युजर जेव्हा इन्स्टाग्रामवर सक्रिय नव्हते, तेव्हा देखील त्यांच्या फोन कॅमेरा सक्रिय असल्याचे आढळून आले आहे. याचिकाकर्त्या ब्रिटनी कॉन्डिटी यांच्या मते, ॲपच्या कॅमेऱ्याचा उपयोग डेटा आणि महत्त्वपूर्ण माहिती चोरीसाठी जाणीवपूर्वक केला जातो; अन्यथा युजर सक्रिय नसतानाही त्याचा कॅमेरा सक्रिय कशासाठी राहू शकतो, असा सवाल करण्यात आला आहे. याप्रकरणी फेसबुकने मत मांडलेले नाही.

डेटाचोरी होण्यापासून वाचण्यासाठी टिप्स

  • आवश्‍यकतेनुसारच ॲपला परवानगी द्या. इन्स्टाग्रामला केवळ कॅमरा आणि गॅलरीची परवानगी द्यावी. कॉन्टॅक्ट किंवा लोकेशनची परवानगी देण्याची गरज नाही
  • जेव्हा आपण एखादा ॲप वापरतो तेव्हा तो बंद करण्याऐवजी मिनिमाइज करतो. प्रत्यक्षात आपण फोनच्या होम बटनाला प्रेस करतो, तेव्हा तो ॲप लहान होऊन बॅकग्राउंडला जातो आणि तो चालू राहतो. अशावेळी ॲप आपल्या डेटावर लक्ष ठेवू शकतात. त्यामुळे काम होताच ॲप बंद करावा. 
  • जर आपण इंटरनेट सतत वापरत नसाल तेव्हा फोनचा डेटा बंद करू शकता. विशेषत: रात्रीच्या वेळी डेटा बंद करायला हवा. डेटा बंद ठेवल्याने फोनचा डेटा चोरी होण्यापासून आपला बचाव होऊ शकतो.
     

संबंधित बातम्या