अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा सोशल मीडिया वापसी?

दैनिक गोमन्तक
सोमवार, 22 मार्च 2021

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जगभरातील अनेक सोशल मीडियानी बंदी घातली आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे मागील अनेक दिवसांपासून सोशल मीडियापासून दूर आहेत.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जगभरातील अनेक सोशल मीडियानी बंदी घातली आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे मागील अनेक दिवसांपासून सोशल मीडियापासून दूर आहेत. परंतु आता डोनाल्ड ट्रम्प हे स्वतःचे सोशल मीडिया नेटवर्क स्थापित करून सोशल अकाउंट उघडणार असल्याची माहिती मिळाली आहे. आणि याबाबतचा खुलासा इतर कोणी नाही तर बराच काळ डोनाल्ड ट्रम्प यांचे वरिष्ठ सल्लागार राहिलेले जेसन मिलर यांनी केला आहे. जेसन मिलर यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत याविषयीची माहिती दिली आहे.   

राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समर्थकांना चेतावणी दिली होती. आणि तसेच त्यांनी अमेरिकेच्या कॅपिटॉलवर चढाई करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर अमेरिकेच्या इतिहासात कधी नव्हे तेंव्हा कॅपिटॉलवर हिंसाचार झाल्याचे पाहायला मिळाले होते. या घटनेनंतर बहुतेककरून सर्वच सोशल मीडियाने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता, आगामी दोन ते तीन महिन्यांमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सोशल मीडियावर पाहायला मिळणार असल्याचे जेसन मिलर यांनी सांगितले आहे. त्यांनी याबाबत अधिक माहिती देताना, डोनाल्ड ट्रम्प यांच्याच वेबसाईट मार्फत ते सोशल मीडियावर येणार असल्याचे सांगितले आहे.      

World Water Day 2021: जलशक्ती अंतर्गत कॅच द रेन अभियानाची सुरुवात

शिवाय, हा नवीन प्लॅटफॉर्म 'सोशल मीडियाचा गेम' पूर्णपणे बदलून टाकेल असा दावा जेसन मिलर यांनी केला आहे. परंतु जेसन मिलर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन येणाऱ्या वेब साईटचे स्वरूप काय असेल याविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र यामुळे आगामी काळात सोशल मीडियाच्या  'खेळाची नव्याने व्याख्या' होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. आणि ही सोशल मीडिया कोट्यवधी लोकांना आपल्याकडे आकर्षित करेल, असे जेसन मिलर यांनी नमूद केले. तसेच, डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये लाखो लोकांना आपल्या डिजिटल उपस्थितीने जोडण्याची क्षमता असल्याचे सांगितले.   

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प हे नव्या व्यासपीठाच्या माध्यमातून कोट्यावधी लोकांशी संपर्क साधणार असल्याचा दावाही मागील काही दिवसांपासून केला जात आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटर वर खूप सक्रिय होते. परंतु 6 जानेवारीला कॅपिटॉल हिलवर हिंसा झाल्यानंतर ट्विटर कडून त्यांचे अकाउंट तात्पुरते बंद करण्यात आले होते. आणि पुन्हा ट्रम्प यांच्यावर हिंसा भडकवल्याचा आरोप करत ट्विटरने त्यांचे खाते कायमचे बंद केले होते. तथापि, त्यांच्या निर्णयाला त्यांच्या समर्थकांनी तीव्र विरोध दर्शविला आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचे म्हटले होते.

संबंधित बातम्या