मास्क नसलेल्या प्रवाशांच्या मारहाणीत फ्रेंच बसचालक मृत्युमुखी

Avit Bagle
रविवार, 12 जुलै 2020

याप्रकरणी दोन तरुणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पूर्वी गैरकृत्ये केल्यामुळे ते पोलिसांच्या रेकॉर्डवर होते. इतर दोघांवर संकटात सापडलेल्या वक्तीला मदत न केल्याचा आरोप ठेवण्यात आला.

बेयॉन (फ्रान्स)

मास्क नसल्यामुळे बसमध्ये चढण्यास मनाई केलेल्या चालकाला तीन प्रवाशांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे बसचालक मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना फ्रान्समध्ये घडली.
फिलीप माँग्युलॉत असे त्यांचे असून ते 59 वर्षांचे होते. त्यांची मुलगी मेरी हिने सांगितले की, रविवारी त्यांना मारहाण झाली होती. कोरोना संसर्गाच्या विरोधात नियमांचे पालन व्हावे म्हणून त्यांनी विचारणा केली होती. इतर एका प्रवाशाला त्यांनी तिकिटाबाबत विचारणा केली होती.
याप्रकरणी दोन तरुणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पूर्वी गैरकृत्ये केल्यामुळे ते पोलिसांच्या रेकॉर्डवर होते. इतर दोघांवर संकटात सापडलेल्या वक्तीला मदत न केल्याचा आरोप ठेवण्यात आला.
वकील जेरॉम बौरीयर यांनी सांगितले की, बसचालकाचा मृत्यू झाल्यामुळे आरोपाचे कलम बदलण्यात यावे म्हणून आपण याचिका दाखल करू.

कुटुंबीयांचा मूक मोर्चा
बुधवारी फिलीप यांच्या कुटुंबीयांनी हल्याचे ठिकाण असलेल्या बसथांब्यापासून मूक मोर्चा काढला.

अनेक चालक संपावर
अनेक सहकारी चालकांनी त्यांच्या अधिकारानुसार काम करण्यास नकार दर्शवून संप केला. बेयॉनचे महापौर जीन-रेने एचेगॅराय यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली. त्यामुळे चालकांनी कामावर रुजू होण्यास सहमती दर्शविली.
दरम्यान, गृहमंत्री जेराल्ड डॅर्मानीन यांनीही शनिवारी बेयॉनचा दौरा केला आणि सुरक्षा व्यवस्थेच्या आढाव्याबाबत बसचालकांशी चर्चा केली.

अखेर उपचार थांबविले
रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर सोमवारीच फिलीप ब्रेनडेड झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते. त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, पण उपचारास प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अखेर ते थांबविण्याचा निर्णय कुटुंबीयांना जड अंतःकरणाने घ्यावा लागला.
 

संबंधित बातम्या