खुद्द उपाध्यक्ष माइक पेन्स यांनीच डोनाल्ड ट्रम्प यांना दिला पराभव स्विकारण्याचा सल्ला

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 7 जानेवारी 2021

अध्यक्षीय निवडणुकीतील ज्यो बायडेन यांच्या विजयाला आव्हान देण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांना अधिकार नसल्याचे खुद्द उपाध्यक्ष माइक पेन्स यांनीच ट्रम्प यांना सांगितल्याचा दावा येथील माध्यमांनी केला आहे.

वॉशिंग्टन : अध्यक्षीय निवडणुकीतील ज्यो बायडेन यांच्या विजयाला आव्हान देण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांना अधिकार नसल्याचे खुद्द उपाध्यक्ष माइक पेन्स यांनीच ट्रम्प यांना सांगितल्याचा दावा येथील माध्यमांनी केला आहे. अध्यक्ष ट्रम्प मात्र अद्यापही ‘मी हरलेला नाहीच’ या हट्टावर कायम आहेत. अमेरिकेत २० जानेवारीला बायडेन यांचा अध्यक्षपदावर शपथविधी होणार आहे. 

‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांच्याबरोबर दर आठवड्याला होणाऱ्या एकत्रित भोजनादरम्यान माइक पेन्स यांनी त्यांना सल्ला दिला. अमेरिकेच्या सिनेटमध्ये उद्या इलेक्टोरल मतांची मोजणी होणार असून यावेळी अध्यक्षीय निवडणुकीतील विजेत्याची अधिकृत घोषणा होणार आहे. माइक पेन्स हेच सिनेटचे विद्यमान अध्यक्ष आहेत. बायडेन यांना निवडणूकीत ३०६, तर ट्रम्प यांना २३२ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. त्यामुळे बायडेन यांच्या विजयाची घोषणा पेन्स यांनाच करावी लागेल. कोर्टानेही ट्रम्प यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगूनही त्यांनी पराभव अद्यापही स्वीकारलेलाच नाही. तरीही, सिनेटमध्ये मतमोजणी झाल्यावर बायडेन यांना विजयाचे प्रमाणपत्र देण्यापासून संसदेला रोखण्याचा ट्रम्प यांना अधिकार नसल्याचे पेन्स यांनी त्यांना सांगितले.  ट्रम्प यांनी मात्र, पेन्स यांनी मला असे काही सांगितलेच नाही, असा दावा करताना वृत्त खोटे असल्याचे सांगितले. याउलट, गैरप्रकार करून निवडून आलेल्यांना नाकारण्याचे पेन्स यांना अधिकार असल्याचा दावा करत ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिकच्या गोटात चिंता वाढविली.

मतमोजणीवेळी गोंधळ शक्य

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अंतिम टप्पा म्हणून संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त अधिवेशनात इलेक्टोरल मतांची मोजणी होणार आहे. याद्वारे अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. सर्वसाधारणपणे ही प्रक्रिया सुरळीत पार पडत असली तरी यावेळी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव स्वीकारला नसल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते. 

संबंधित बातम्या