लसीकरण केंद्रासाठी ‘गुगल’ देणार जागा

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 26 जानेवारी 2021

अमेरिकेतील कोरोना लसीकरणाला साह्य करण्यासाठी गुगल कंपनीने त्यांच्या जागा खुल्या केल्या असून या ठिकाणी लसीकरण केंद्र उभारता येतील, असे ‘गुगल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी जाहीर केले आहे.

वाशिंग्टन: अमेरिकेतील कोरोना लसीकरणाला साह्य करण्यासाठी गुगल कंपनीने त्यांच्या जागा खुल्या केल्या असून या ठिकाणी लसीकरण केंद्र उभारता येतील, असे ‘गुगल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी जाहीर केले आहे. तसेच, लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी १५ कोटी डॉलरचा निधी देणार असल्याचेही पिचाई यांनी सांगितले. 

सुंदर पिचाई यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे ही घोषणा केली. ‘लसीकरण केंद्र सुरु करण्यासाठी आम्ही आमच्या कार्यालयांची जागा खुली करत आहोत. लसीकरण केंद्रांचा शोध घेणे सामान्यांना सोपे जावे, यासाठी १५ कोटी डॉलरचा निधी देण्यासाठीही आम्ही कटिबद्ध आहोत. गेल्या वर्षभरात घराजवळील लसीकरण केंद्राचा इंटरनेटवर शोध घेणाऱ्यांची संख्या पाच पटींनी वाढली आहे.

सुंदर पिचाई यांनी सांगितले की,'' कोरोना संकटाच्या सुरुवातीपासून ‘गुगल’ने आतापर्यंत शंभरहून अधिक सरकारी आणि बिगर सरकारी संस्थांना आपल्या ॲड ग्रँट्‌स क्रायसिस रिलिफ’ कार्यक्रमाद्वारे मदत केली आहे.'' यामध्ये आणखी १० कोटी डॉलरची भर टाकणार असून ५ कोटी डॉलरचा निधी वापरून लसीकरणाबाबत जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या