जगभर नवी उमेद आणि नववर्षाचा जल्लोष!

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जानेवारी 2021

सरलेल्या २०२० वर्षातील बहुतांश महिने कोविड महामारीने गिळंकृत केल्याने २०२१चे मोठ्या आशा, अपेक्षा, आकांक्षासह दमदार स्वागत करण्यात आले. सरत्या वर्षात नवे वर्ष काहीतरी चांगले घेऊन येईल, असा दुर्दम्य आशावाद प्रत्येकाच्या मनात रुंजी घालत होता.

पणजी  : सरलेल्या २०२० वर्षातील बहुतांश महिने कोविड महामारीने गिळंकृत केल्याने २०२१चे मोठ्या आशा, अपेक्षा, आकांक्षासह दमदार स्वागत करण्यात आले. सरत्या वर्षात नवे वर्ष काहीतरी चांगले घेऊन येईल, असा दुर्दम्य आशावाद प्रत्येकाच्या मनात रुंजी घालत होता. त्याला नववर्ष स्वागताच्या निमित्ताने पालवी फुटली आणि कोविड महामारीचे सावट असतानाही सारी बंधने झुगारत नव्या वर्षाचे स्वागत झाले. नवे वर्ष जगण्याची नवी उमेद प्रत्येकाला देत आले आहे. नवा बहर, नवा मोहोर, नवी आशा, नवी स्वप्ने घेऊन नवे वर्ष आले आहे.

आकांक्षा द्विगुणीत...
कोविडशी दोन हात करण्याची ताकद नव्या वर्षात मिळाल्याची भावना अनेकांची आहे. त्याचमुळे २०२० वर्ष कधी सरते याची ते वाट पाहत होते. सरत्या वर्षाला त्याचमुळे मोठ्या गर्दीत निरोप देण्यात आला. मध्यरात्री सूर्य काही उगवत नाही पण इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे दिवस बदलतो. यामुळे मध्यरात्रीच्या ठोक्यावर नव्या वर्षात जोशपणे जगू हे सांगण्यासाठी अनेकांनी आपला आनंद मोठ्या उमेदीने व्यक्त केला. त्यात नेहमीची कृत्रिमता नव्हती, तर नैसर्गिकपणे हे नवे वर्ष नव्या आकांक्षांना द्विगुणीत करेल, असा विश्वास झळकत होता.लाखो पर्यटकांकडून जल्लोष

निर्धाराचा नवसंकल्‍प
कोविड महामारीमुळे मार्चच्या अखेरीस टाळेबंदी झाली. अनेक चक्रे थांबली तसे उत्पन्नही थांबले. जगण्याचा संघर्ष अनेकांच्या वाट्याला आला. आता चाळीशीत असलेल्या पिढीने दुष्काळ, पूर, महामारीचा अनुभव कधी घेतला नव्हता. त्यामुळे अकल्पित अशा परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यातून सावरत नवे वर्ष चांगले काहीतरी घेऊन येईल या आशेवर त्यांनी परिस्थितीशी दोन हात केले. ज्या नव्या वर्षाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते, त्याची सुरवातही झाली आहे. काही दिवसांत कोविडवरील लसीकरणाची माहिती मिळेल असे अनेकांना वाटते. कोविडचे अस्तित्व असले तरी माणसास ते रोखू शकत नाही हा संदेश या वर्षात देण्याचा संकल्प अनेकांनी सोडला आहे. 
 

 

संबंधित बातम्या