हार्ट ऑफ एशिया परिषदेला आजपासून सुरवात; अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर होणार चर्चा 

दैनिक गोमंतक
मंगळवार, 30 मार्च 2021

तजाकिस्तानमध्ये आयोजित हार्ट ऑफ एशिया परिषदेला आजपासून सुरवात होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर दुशान्बे येथे दाखल झाले आहेत.

तजाकिस्तान : तजाकिस्तानमध्ये आयोजित हार्ट ऑफ एशिया परिषदेला आजपासून सुरवात होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर दुशान्बे येथे दाखल झाले आहेत. तर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री महमूद कुरेशीही या बैठकीत  सहभागी होणार आहेत. नियंत्रण रेषेवरील (एलओसी) गोळीबार थांबविण्याचे मान्य केल्यानंतर हे प्रथमच भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री एकाच कक्षात हजर असतील. बैठकीतील सर्व नेत्यांची नजर भारत-पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांकडे असण्याची  शक्यता वर्तवण्यात आली आहे.  तथापि, अद्याप दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांमधील द्विपक्षीय बैठकीबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

भारतीय परराष्ट्र मंत्र्यांसोबत अद्याप बैठक ठरली नाही; परराष्ट्र मंत्री कुरेशी...

दुशान्बे येथे पोहोचल्यानंतर मंत्री एस. जयशंकर यांनी तुर्कीचे परराष्ट्रमंत्री मेवलूत चावुशोलोव्ह आणि इराणचे परराष्ट्रमंत्री जावद जरीफ यांची भेट घेतली. एस. जयशंकर यांच्या चावुशोलोव्ह यांच्याशी अफगाणिस्तानला मदत करण्यासाठी हार्ट ऑफ आशिया प्रक्रिया राबविण्यासंबंधी चर्चा झाली. तर इराणचे परराष्ट्रमंत्री झरीफ यांच्याशी झालेल्या चर्चेत चाबहारसह द्विपक्षीय सहकार्याचे प्रकल्प आणि वाढती भागीदारीच्या अशा अनेक मुद्दयावर चर्चा करण्यात आली.  त्याचबरोबर या परिषदेत दहशतवादाचे दुष्परिणाम दूर करणे, व्यापाराला चालना देणे, परस्पर सहकार्य मजबूत करण्यासह इतरही अनेक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

त्याचबरोबर, अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याच्या नवीन आंतरराष्ट्रीय प्रयत्नांची फेरी पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. यात भारतही महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. आपल्या महत्त्वपूर्ण सामरिक भागीदार देशात शांतता प्रस्थापित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी या वाटाघाटींमध्ये कायमस्वरूपी युद्धविराम करण्यास सहमती देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट संकेत भारताने दिले आहेत.  तसेच अफगाणिस्तानात आणि जगामध्ये कायमस्वरुपी शांती व समृद्धी प्रस्थापित होण्यासाठी कायमस्वरुपी शांतता असणे फार महत्वाचे आहे. मात्र  त्या यशासाठी कायमस्वरुपी युद्धबंदी  घोषित करणे आवश्यक असल्याचा मुद्दा जयशंकर यांनी अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर हा मुद्दा मांडला. असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.  

संबंधित बातम्या