टोळ नियंत्रणसाठी एचआयएल (इंडिया) इराणला कीटकनाशकांचा पुरवठा करणार

Pib
मंगळवार, 16 जून 2020

टोळधाडीचा धोका त्याच्या पैदासिच्यावेळीच रोखण्यासाठी भारताने पुढाकार घेतला असून समन्वयित प्रयत्नांसाठी इराणशी संपर्क साधला आहे. 

नवी दिल्‍ली, 

रसायने आणि खत मंत्रालया अंतर्गत कार्यरत सार्वजनिक क्षेत्रातील युनिट आणि देशातील कीटकनाशके उत्पादित करणाऱ्या कंपन्यांपैकी एक अग्रगण्य कंपनी एचआयएल (इंडिया) मर्यादितने इराणला टोळ नियंत्रण कार्यक्रमासाठी सरकार-ते-सरकार उपक्रमांतर्गत 25 एमटी मॅलॅथियन 95% युएलव्ही कीटकनाशकांचा पुरवठा केला आहे. 

इराण आणि पाकिस्तान प्रदेशातील वाळवंटी टोळांच्या हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी भारताने अलीकडेच या उभय देशांशी समन्वय साधला होता. इराणने या प्रस्तावावर सहमती दर्शविली आणि त्यानुसार परराष्ट्र मंत्रालयाने एचआयएल (इंडिया) मर्यादितला इराणला 25 मेट्रिक टन मॅलॅथियन 95% युएलव्ही उत्पादित करून पुरवठा करण्याचा आदेश दिला आहे. 16 जूनपर्यंत कीटकनाशकांचा हा माल इराणला पोहोचेल.

अन्न व कृषी संघटनेच्या (एफएओ) अहवालानुसार, इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रदेशात टोळांच्या पिल्लांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि येणाऱ्या काही महिन्यांत पुढील पिकाची नासाडी करण्यासाठी हे टोळ भारतात स्थलांतरीत होतील. 

आफ्रिका, पूर्व आफ्रिका आणि अरबी द्वीपकल्पातील पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यानंतर वाळवंटातील टोळ मार्च / एप्रिल 2020 मध्ये भारतात दाखल झाले आणि त्यांनी राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब आणि उत्तर प्रदेश मधील शेतातील पीक, फळबागा पिकांवर आणि इतर लागवडीवर मोठ्या प्रमाणात हल्ला केला. मागील 25 वर्षातील ही सर्वात मोठी टोळधाड असल्याचे निरीक्षण करण्यात आले आहे. 

एचआयएल (इंडिया) मर्यादित देशातील टोळ नियंत्रण कार्यक्रमासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाला मॅलॅथियन 95% यूएलव्हीचा पुरवठा करत आहे. 2019 पासून आतापर्यंत कंपनीने या कार्यक्रमासाठी 600 मेट्रिक टन पेक्षा जास्त मॅलॅथियन 95% युएलव्ही पुरवठा केला आहे.

संबंधित बातम्या