पाकिस्तान संसदेत मांडला नसलेला राजदूत परत बोलावण्याचा प्रस्ताव

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

फ्रान्समधील राजदूतांना परत बोलावण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला; पण यात एकच समस्या होती आणि ती म्हणजे, पाकिस्तानचा त्या देशात राजदूतच नाही.

इस्लामाबाद:   विश्वकरंडक विजेते क्रिकेट कर्णधार इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पूर्ण संसदच स्वयंचलित होण्याची नामुष्की पाकिस्तानवर ओढवली आहे. फ्रान्समधील राजदूतांना परत बोलावण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला; पण यात एकच समस्या होती आणि ती म्हणजे, पाकिस्तानचा त्या देशात राजदूतच नाही.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी हा ठराव मांडण्यात आला. वास्तविक फ्रान्समधील याआधीचे राजदूत मोईन उल हक यांची तीन महिन्यांपूर्वीच चीनमध्ये बदली झाली होती. त्यानुसार ते तेव्हाच फ्रान्समधून बाहेर पडले होते. त्यानंतर हक यांच्या जागी पाकिस्तानने अद्याप कुणाची नियुक्ती केलेली नाही. पाकने सोमवारी आपल्या देशातील फ्रेंच राजदूताला पाचारण करून फ्रान्स तसेच मॅक्रॉन यांचा निषेध केला होता.

प्रेषित महंमद यांच्या व्यंग्यचित्रांचे प्रदर्शन, तसेच शिरच्छेद झालेले इतिहासाचे शिक्षक सॅम्युएल पॅटी यांना अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी श्रद्धांजली अर्पण केल्यामुळे इस्लामी देश आणि फ्रान्स यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. फ्रान्सचा धिक्कार करणाऱ्या देशांमध्ये तुर्कस्तानच्या जोडीला पाकिस्तान आघाडीवर आहे. 

खुद्द परराष्ट्रमंत्रीही
विशेष म्हणजे संसदेत हा ठराव सादर करणाऱ्या सदस्यांमध्ये परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांचाही समावेश होता. वास्तविक परराष्ट्र खात्याचे प्रमुख या नात्याने या पदाच्या कारभाराची आणि आपल्या कर्तव्याची पूर्ण जाणीव असणे अपेक्षित आहे, पण त्यांनीसुद्धा (नसलेला) राजदूत परत बोलाविण्याची मागणी केली.
 

संबंधित बातम्या