आग्नेय ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा ‘अवतार’

दैनिक गोमन्तक
बुधवार, 16 डिसेंबर 2020

आग्नेय ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा ‘अवतार’ आढळून आल्याने संसर्गाचा पूर्वीपेक्षा अधिक वेगाने प्रसार होऊ शकतो, अशी भीती ब्रिटन सरकारने व्यक्त केली

लंडन: आग्नेय ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा ‘अवतार’ आढळून आल्याने संसर्गाचा पूर्वीपेक्षा अधिक वेगाने प्रसार होऊ शकतो, अशी भीती ब्रिटन सरकारने व्यक्त केली. परिणामी राजधानी लंडन आणि परिसरात उद्या (ता. १६) बुधवारपासून कडक लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सरकारने काल संसदेत घोषणा केली. कोरोनाच्या नव्या ‘अवतारा’मुळे रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढू शकते, असे सरकारने म्हटले आहे. 

आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी म्हटले की, आग्नेय ब्रिटन भागात केवळ सात दिवसात कोरोना संसर्गाचे रुग्ण दुपटीने वाढले आहेत. बाधित होण्याची संख्या आणि रुग्णालयात दाखल होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी तातडीने निर्णय घेणे गरजेचे होते. अशा स्थितीत लंडन आणि परिसरात टीयर-३ स्तरावरचे निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. या नव्या संसर्गामुळे एक हजार बाधित झाले आहेत. 

हँकॉक म्हणाले, की कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे संसर्ग वेगाने पसरत असून सध्यातरी सरकारकडे अन्य कोणताही पर्याय दिसत नाही. या नव्या प्रकाराची सरकार, शास्त्रज्ञ, जागतिक आरोग्य संघटना यांना माहिती देण्यात आली असून ते आपापल्या पद्धतीने मूल्यांकन करत आहेत. हा नवा अवतार कोठून आला हे अद्याप समजले नाही. जोपर्यंत बाजारात लस येत नाही, तोपर्यंत यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. हा संसर्ग वेगाने पसरत असताना सरकारला देखील निर्णय तितक्याच वेगाने घ्यावे लागणार आहेत, असे हॅकॉंक म्हणाले.  

दरम्यान, लंडनमध्ये कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रमाणामुळे सहा प्रीमियर लीग (इपीएल) क्लबच्या श्रोत्यांना मैदानावर येण्यास परवानगी नसेल. केवळ चार आघाडीच्या क्लबना मैदानात २ हजार श्रोत्यांना बोलावण्याची परवानगी असणार आहे.

तुर्कस्तानमध्ये ३१ पासून संचारबंदी
अंकारा कोरोनाच्या साथीमुळे यंदा नव्या वर्षाच्या सुटीत संचारबंदी लागू करण्याची घोषणा तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्येप एर्दोगान यांनी केली. ही संचारबंदी ३१ डिसेंबरला सकाळी नऊपासून  ४ जानेवारीला सायंकाळी पाचपर्यंत लागू होणार आहे. देशात अनेक निर्बंध जाहीर झालेले आहेत. यात सौना बाथ, जलतरण तलाव, व्यायामशाळा आदी बंद ठेवल्या असून दुकानांमध्ये ग्राहकांच्या संख्येवर मर्यादा आणली आहे. 

आणखी वाचा:

संबंधित बातम्या