भारत-अमेरिका संबंध महत्त्वाचे

अवित बगळे
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

चीनबाबत जयशकंरना अमेरिकी खासदारांचे पत्र

वॉशिंग्टन

चीनच्या आक्रमक कारवायांच्या पार्श्वभूमीवर भारत-अमेरिका यांच्यातील सौहार्दपूर्ण द्विपक्षीय संबंधांना महत्त्व प्राप्त झाले आहे, असे अमेरिकेच्या दोन खासदारांनी म्हटले आहे. त्यांनी तसे संयुक्त पत्र भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पाठविले आहे.
अमेरिकी सभागृहाच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष एलियट एजल आणि समितीचे मानांकन सदस्य मायकेल टी. मॅकॉल यांनी हे पत्र पाठविले आहे. पाच ऑगस्ट रोजी 370वे कलम रद्द करण्यात आल्याच्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून हे पत्र पाठविण्यात आले.
त्यात म्हटले आहे की, वर्षभरानंतरही जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुरळीत नाही हे नमूद करताना आम्हाला चिंता वाटते. फेब्रुवारीत नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते की आता उभय देशांतील संबंध ही काही दुसरी कुठली तरी भागीदारी नसून त्यास अत्यंत व्यापक आणि घनिष्ठ स्वरूप मिळाले आहे. चीनलगतच्या सीमेवर तुम्हाला आक्रमक कारवायांना सामोरे जावे लागत आहे. आशिया-पॅसिफीक विभागात चीन सरकारने सतत बेकायदेशीर आणि भांडखोर कारवायांचे धोरण ठेवले आहे.

पत्रातील प्रमुख मुद्दे
- सार्वभौमत्व आणि प्रांतीय एकात्मतेचे संरक्षण करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यास अमेरिका खंबीर
- विभागातील सुरक्षा आणि दहशतवादविरोधामुळे चिंता
- भारत सरकारच्या साथीत यावर मार्ग काढण्यास उत्सुक
- दोन्ही देशांचा पाया लोकशाही मूल्ये आणि स्वातंत्र्यावर आधारलेला असल्यामुळे समान निष्ठेचा पुरस्कार
- भक्कम तसेच परस्परपूरक संबंध आणखी भक्कम करण्यास उत्सुक
- संरक्षणापासून हवामान बदलापर्यंत विविध विषयांवर दोन्ही देशांत घनिष्ठ सहकार्य
- उभय देशांतील भक्कम संबंध 21व्या शतकातील वाटचालीच्यादृष्टिने निर्णायक

संबंधित बातम्या