‘पाक दहशतवादाची फॅक्टरी‌’; भारताने पाकिस्तानाला सुनावले खडे बोल

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

दहशतवादाची फॅक्टरी असलेल्या पाकिस्तानचे भारतावर दहशतवाद पसरविण्याचे आरोप म्हणजे निव्वळ कांगावा आहे. पाकिस्तानचे पुरावे म्हणजे बिनबुडाच्या, कपोलकल्पित असून या देशाच्या कारस्थानांची आंतरराष्ट्रीय समुदायाला जाणीव आहे, अशा शब्दात भारताने पाकिस्तानाला खडे बोल सुनावले आहेत.

नवी दिल्ली :  दहशतवादाची फॅक्टरी असलेल्या पाकिस्तानचे भारतावर दहशतवाद पसरविण्याचे आरोप म्हणजे निव्वळ कांगावा आहे. पाकिस्तानचे पुरावे म्हणजे बिनबुडाच्या, कपोलकल्पित असून या देशाच्या कारस्थानांची आंतरराष्ट्रीय समुदायाला जाणीव आहे, अशा शब्दात भारताने पाकिस्तानाला खडे बोल सुनावले आहेत.

पाकिस्तान सरकारने काल पत्रकार परिषद घेऊन भारतावर पाकिस्तानात दहशतवाद पसरवत असल्याचा आरोप केला होता. तसेच याबाबतचे भारताविरोधातील पुरावेही असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. अमेरिकेतील सत्ताबदलाचा मुहूर्त निवडून पाकिस्तानने भारतावर हा कांगावा चालविला आहे.  त्यापार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी, पाकिस्तानचे आरोप धादांत खोटे आणि भारतविरोधी प्रचाराचा भाग असल्याचे प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, की भारताविरोधातील या तथाकथित, कपोलकल्पित पुराव्यांची काहीही विश्वासार्हता नाही. दहशतवादाचा पुरस्कर्ता म्हणून पाकिस्तानी नेतृत्वाने जाहीर कबुली दिली आहे.

त्यामुळे या देशाच्या उपद्व्यापांची आंतरराष्ट्रीय समुदायाला जाणीव असल्याने या निराधार पुराव्यांचा काहीही परिणाम होणार नाही. पाकिस्तानने दहशतवादाचे खुले समर्थन तातडीने थांबावे. पाकिस्तान ही दहशतवादाची फॅक्टरी असल्याचे तेथील नेत्यांनी कधीही लपवून ठेवलेले नाही. केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील अनेक दहशतवादी घटनांचा माग पाकिस्तानापर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे खोटीनाटी कागदपत्रे आणि कपोलकल्पित पुरावे दाखवून पाकिस्तानची बाजू योग्य ठरणार नाही, असा इशाराही अनुराग श्रीवास्तव यांनी दिला.

संबंधित बातम्या