भारत-इस्राईल-अमेरिका ५ जीसाठी एकत्र

पीटीआय
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

५ जी तंत्रज्ञानासाठी सहकार्य हे हिमनगाचे एक टोक असून आम्ही विज्ञान, संशोधन आणि विकसीत होत जाणाऱ्या पुढील पिढीतील तंत्रज्ञानात सहकार्य करणार असल्याचे अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास संस्थेच्या उपप्रमुख बोनी ग्लिक यांनी एका मुलाखतीवेळी सांगितले.

वॉशिंग्टन: भारत, इस्राईल आणि अमेरिका या देशांनी एकत्र येत विकसनशील क्षेत्र आणि पुढील पिढीतील उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये सर्वांना पारदर्शक, खुले, विश्‍वासार्ह आणि सुरक्षित ५ जी तंत्रज्ञान मिळण्यासाठीही एकत्रित प्रयत्न सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र यांच्या गेल्या काही वर्षांतील अमेरिका आणि इस्राईल दौऱ्यात तेथील नागरिकांशी, विशेषत: भारतीय वंशाच्या नागरिकांशी झालेल्या थेट संवादातून या त्रिस्तरीय सहकार्याला बळ मिळाले असल्याचे सांगण्यात आले. ५ जी तंत्रज्ञानासाठी सहकार्य हे हिमनगाचे एक टोक असून आम्ही विज्ञान, संशोधन आणि विकसीत होत जाणाऱ्या पुढील पिढीतील तंत्रज्ञानात सहकार्य करणार असल्याचे अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास संस्थेच्या उपप्रमुख बोनी ग्लिक यांनी एका मुलाखतीवेळी सांगितले.

‘‘भविष्यातील तंत्रज्ञान कसे असेल याबाबत आपण विचारही करू शकत नाही. मात्र अधिकृतरित्या एकत्र आल्याने संबंधांना महत्त्व आले असून यात आम्ही अधिक पुढचा टप्पा गाठला आहे. जगासमोरील आव्हाने एकत्रितपणे सोडविण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’’ गेल्याच आठवड्यात भारत-अमेरिका-इस्राईल या देशांची तंत्रज्ञान आणि विकास सहकार्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली होती. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या