भारताने हाकलले; पाकने कवटाळले

Avit Bagle
सोमवार, 20 जुलै 2020

या गटाच्या सदस्यांना रक्कम आणि इतर स्वरूपात मिळणारा मोबदला जाहीर करावा लागतो.

लंडन

लेबर पक्षाच्या खासदार डेबी अब्राहम्स यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटनमधील संसद सदस्यांनी यंदा पाकिस्तान दौरा केल्याचे व त्यामोबदल्यात त्यांना पाकिस्तानकडून तीस लाख रुपये रक्कम मिळाल्याचे वृत्त आहे. काश्मीरवरील सर्वपक्षीय संसदीय गटाच्या रजिस्टरमध्ये तसा उल्लेख आहे. भारताने हकालपट्टी केल्यानंतर डेबी यांनी हा दौरा केल्याचेही उघड झाले.
या गटाच्या सदस्यांना रक्कम आणि इतर स्वरूपात मिळणारा मोबदला जाहीर करावा लागतो. रजिस्टरमध्ये पावत्यांच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उल्लेखानुसार 18 फेब्रुवारी रोजी सदस्यांना 29 लाख 70 हजार ते 31 लाख 20 हजार रुपये यांतील रक्कम मिळाली. 18 ते 22 फेब्रुवारी दरम्यान हा दौरा झाला.

भारतातून रवानगी
डेबी 17 फेब्रुवारी रोजी भारतात दाखल झाल्या होत्या, पण त्यांना इ-व्हिसा वैध नसल्यामुळे दिल्ली विमानतळावरूनच त्यांची रवानगी करण्यात आली. त्यांना दुबईला पाठविण्यात आले. वास्तविक त्यांच्याकडे यंदा ऑक्टोबरपर्यंतचा व्हिसा होता, पण भारतविरोधी वक्तव्ये केल्यामुळे तो रद्द करण्यात आला. भारताने 370वे कलम रद्द केल्याबद्दल तसेच जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढू घेतल्याबद्दल डेबी यांनी टीकेची झोड उठविली आहे.

भारतावर आरोप
भारताने आल्याक्षणी रवानगी करताच डेबी यांनी आगपाखड केली होती. आपल्याला गुन्हेगारासारखे वागविण्यात आले आणि दिल्लीतील मित्रमंडळी तसेच ‘कुटुंबीयां़ची भेट घेण्यापासून रोखण्यात आले असा आरोप त्यांनी केला होता.
या गटाने पाकिस्तानकडून रक्कम स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. 17 सप्टेंबर 2018 रोजी लंडनमधील पाक उच्चायुक्तालयाकडून 12 हजार पौंड रक्कम देण्यात आली होती. त्यावर्षी इस्लामाबाद आणि काश्मीरचा दौरा 17 ते 20 सप्टेंबर दरम्यान झाला होता.

डेबी अब्राहम्स यांचे वक्तव्य आणि विचारसरणी भारतविरोधी आहे. त्यांनी भारताच्या विरोधात सातत्याने मोहीम राबविली आहे.
- रवीश कुमार, परराष्ट्र प्रवक्ते

संबंधित बातम्या