पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारताने फटकारले

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

नगरोटा येथे दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईनंतर या प्रकरणात आज परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून खडसावले. सुरक्षादलांनी जम्मूतील नगरोटा येथे जैशे महंमद या दहशतवादी संघटनेच्या चार दहशतवाद्यांचा खात्मा करून संभाव्य हल्ल्याचा डाव उधळून लावला होता.

नवी दिल्ली : नगरोटा येथे दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईनंतर या प्रकरणात आज परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून खडसावले. सुरक्षादलांनी जम्मूतील नगरोटा येथे जैशे महंमद या दहशतवादी संघटनेच्या चार दहशतवाद्यांचा खात्मा करून संभाव्य हल्ल्याचा डाव उधळून लावला होता.

दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, स्फोटके आढळून आली होती. 
मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याच्या स्मृतीदिनाचे निमित्त साधून दहशतवादी मोठे काही घडविण्याच्या प्रयत्नात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलांनी केलेल्या या कारवाईची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तोंडभरून प्रशंसा केली होती. तसेच गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गृहसचिवांची तातडीची बैठक बोलावून सुरक्षा व्यवस्थेचा आढावादेखील काल घेतला होता. त्यानंतर आज परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फटकारले. 

जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक जिल्हा विकास परिषदांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना जैश ए महंमदच्या या हल्ल्याच्या प्रयत्नांवरून परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र चिंता व्यक्त केली. दहशतवादाला आणि दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत देण्याच्या धोरणाला पाकिस्तानने लगाम लावावा. दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करावे. आपल्या भूभागाचा दहशतवादी कारवायांसाठी वापर न होऊ देण्याच्या आंतरराष्ट्रीय जबाबदारीचे आणि द्विपक्षीय करारांचे पाकिस्तानने पालन करावे, असेही यावेळी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना सुनावण्यात आले.

 

संबंधित बातम्या