भारतीय वंशांच्या हेर नूर यांचा ब्रिटनमध्ये सन्मान

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

इंग्लिश हेरिटेज चॅरिटीमार्फत द ब्लू प्लाक स्किम (नील फलक योजना) राबवण्यात येते. या योजनेर्तंगत प्रसिद्ध, नामांकित व्यक्ती आणि संघटनेचा ब्रिटनमधील इमारतजवळ नीलफलक उभारून सन्मान केला जातो.  ‘नूर इनायत खान जीसी, १९१४-४४, एसओई’़ असे नीलफलकावर लिहण्यात आले आहे. 

लंडन: दुसऱ्या जागतिक महायुद्धात ब्रिटनसाठी हेरगिरी करणाऱ्या मूळ भारतीय वंशांच्या नूर इनायत खान (१९१४-१९४४) यांच्या धाडसी कामगिरीचा गौरव म्हणून मध्य लंडनमधील त्यांच्या पारंपारिक निवासस्थानी नीलफलक लावण्यात आला आहे. अशा प्रकारचा सन्मान मिळवणाऱ्या त्या भारतीय वंशांच्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. 

इंग्लिश हेरिटेज चॅरिटीमार्फत द ब्लू प्लाक स्किम (नील फलक योजना) राबवण्यात येते. या योजनेर्तंगत प्रसिद्ध, नामांकित व्यक्ती आणि संघटनेचा ब्रिटनमधील इमारतजवळ नीलफलक उभारून सन्मान केला जातो.  ‘नूर इनायत खान जीसी, १९१४-४४, एसओई’़ असे नीलफलकावर लिहण्यात आले आहे. 

इनायत खान यांच्या नावाचा नीलफलक ब्लूम्सबरी येथे फोर टेविटोन स्ट्रीटवर उभारला आहे. १९४३ रोजी फ्रान्ससाठी रवाना होण्यापूर्वी इनायत खान फोर टेविटोन स्ट्रीटवर राहत होत्या. त्या ब्रिटनच्या विशेष मोहिमेतंर्गत  (एसओई) रेडिओ संचालक म्हणून फ्रान्सला गेल्या होत्या. नाझीविरद्धच्या विशेष मोहिमेसाठी त्यांची निवड करण्यात आली होती.

नूर या भारतीय सूफी संत हजरत इनायत खान यांची कन्या तसेच १८ व्या शतकातील म्हैसूर शासक टिपू सुलतान यांच्या वंशज होत्या. १९४४ रोजी जर्मन सैनिकांनी त्यांना पकडले आणि दावचू येथील छळछावणी येथे हत्या करण्यात आली. नूर यांनी मरेपर्यंत कोणत्याही प्रकारची माहिती उघड केली नाही. एवढेच नाही तर आपले खरे नाव देखील सांगितले नाही.

इतिहासकार तसेच ‘स्पाय प्रिन्सेंस: द लाइफ ऑफ नूर इनायत खान’च्या लेखिका श्रावणी बसू यांनी म्हटले की, जेव्हा इनायत खान आपल्या शेवटच्या मोहिमेवर रवाना झाल्या तेव्हा त्यांनी एक दिवस आपण धाडसाचे प्रतिक होवू याचा विचार देखील केला नसेल. त्या असामान्य हेर होत्या. सूफी असल्यामुळे अहिंसा आणि धार्मिक सलोखा यावर त्यांचा विश्‍वास होता. लेखिका बसू यांनी एका लहान सोहळ्यात नीलफलकाचे अनावरण केले. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या