कोविड-१९ बाधितांसाठी अमेरिकी भारतीयांचा पुढाकार

Dainik Gomantak
शुक्रवार, 26 जून 2020

भोजन आणि उपचाराची सोय; गरजूंना लॅपटॉपही

वॉशिंग्टन

वॉशिंग्टन आणि परिसरातील भारतीय अमेरिकी डॉक्टर आणि गुरुद्वारांनी एकत्र येऊन कोविड-१९ बाधितांसाठी अन्नछत्राची सोय केली आहे. बाधित झालेल्या सुमारे ३५० कुटुंबांच्या मदतीसाठी ग्रेटर वॉशिंग्टन असोसिएशनचे मूळ भारतीय वंशाचे डॉक्टर आणि गुरुनानक फाउंडेशन ऑफ अमेरिकेच्या मेरिलँड गुरुद्वारा यांनी पुढाकार घेतला आहे. या आधारे गेल्या आठवड्यात पहिले फूड ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय उपचारासाठी पैसे आणि गरजू विद्यार्थ्यांना लॅपटॉपही देण्यात आले.
वॉशिंग्टन डीसीच्या मेरिलँड आणि व्हर्जिनिया उपनगरात कोविड १९ च्या वाढत्या संसर्गामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनामुळे सुमारे दोन लाख अमेरिकी नागरिकांना बेरोजगार व्हावे लागले असताना अमेरिकेतील अनेक भारतीय-अमेरिका संस्था एकत्र येऊन सामाजिक उपक्रम राबवत आहेत. बेरोजगार, बाधित आणि गरजू विद्यार्थ्यांची मदत करत आहेत. भारत-अमेरिकी संस्थांनी एकत्र येऊन शाळा, कम्युनिटी कॉलेज, मंदिर आणि गुरुद्वारा येथे भोजनाची व्यवस्था केली जात आहे. यासाठी निधी गोळा करून मूळ भारतीयांनी एकतेचे अनोखे दर्शन घडविले आहे. या संघटनेला आणि गुरुद्वाराला अनेक भारतीय अमेरिकी संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. याशिवाय कोविड-१९ मुळे भारतात परतू न शकलेल्या आणि औषध घेण्यासही अडचणीचा सामना करणाऱ्या भारतीयांची जबाबदारीही या संस्थांनी उचलली आहे. अलीकडेच लॅपटॉपअभावी या भागातील शेकडो विद्यार्थ्यांना मॉंटगोमेरी कॉलेजच्या ऑनलाइन क्लासपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे या अडचणीची दखल घेत संस्थेच्या डॉक्टरांनी गरजू विद्यार्थ्यांना ५० हून अधिक लॅपटॉपचे वितरण करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, अमेरिकेत सुमारे २४ लाख ३० हजार नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून, १ लाख २४ हजारांहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.

संबंधित बातम्या