भारताची भूक वाढली, पोटं भरेनात

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

कोरोनामुळे एकीकडे  आर्थिक विपन्नावस्था वाढत चालली असताना देशातील भूक देखील मोठी होताना दिसत आहे.  ‘वैश्‍विक भूक निर्देशांक-२०२०’मधून पुन्हा एकदा धक्कादायक चित्र समोर आले आहे.

 बर्लिन : कोरोनामुळे एकीकडे  आर्थिक विपन्नावस्था वाढत चालली असताना देशातील भूक देखील मोठी होताना दिसत आहे.  ‘वैश्‍विक भूक निर्देशांक-२०२०’मधून पुन्हा एकदा धक्कादायक चित्र समोर आले आहे. या निर्देशांकामध्ये १०७ देशांचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये भारत ९४ व्या स्थानी आहे.  या अहवालामध्ये २७.२ गुणांसह भारताचा गंभीर स्थिती असणाऱ्या देशांच्या  श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला आहे. मागील वर्षी ११७ देशांच्या क्रमवारीमध्ये भारताला १०२ वे स्थान मिळाले होते.या क्रमवारीमध्ये भारत नेपाळ (७३), पाकिस्तान (८८), बांगलादेश (७५) आणि इंडोनेशिया (७०) आदी देशांपेक्षाही मागे आहे.]

या १०७ देशांच्या यादीमध्ये भारतापेक्षाही वाईट स्थिती असणारे तेरा देश आहेत. त्यामध्ये रवांडा (९७), नायजेरिया (९८), अफगाणिस्तान (९९), लायबेरिया (१०२), मोझांबिक (१०३), चाड (१०७) आदींचा समावेश होतो.

या अहवालानुसार देशातील १४ टक्के लोकसंख्या ही कुपोषित असून खुज्या मुलांची संख्या ३७.४ टक्के एवढी आहे. या मुलांची उंची त्यांच्या वयाच्या तुलनेमध्ये कमी असून त्यातून त्यांच्यातील दीर्घकालीन कुपोषणच दिसून येते. कन्सर्न वर्ल्डवाईड आणि वेलथंगरहिल्फ या दोन संस्थांनी हा अहवाल तयार केला आहे. यासाठी विविध निकषांचा वापर करून वैश्‍विक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवरील भुकेचा वेध घेण्यात आला. बांगलादेश, भारत, नेपाळ आणि पाकिस्तान या देशांतील १९९१-२०१४ याकाळातील डेटाचा अभ्यास केल्यास एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते. ती म्हणजे मुलांमधील खुजेपणा वाढलेला दिसून येतो. या भागातील नागरिकांना आहारामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही देशांमधील स्थिती ही गंभीर असून काही ठिकाणांवर सुधारणा होताना दिसून येते.

जगातील ४६ देशांचा गंभीर धोका असणाऱ्या श्रेणीमध्ये समावेश होतो. या निर्देशांकातील गुणांमध्ये २०१२ पासून सुधारणा होताना दिसून येते पण चौदा देशांची अवस्था ही फार बिकट असल्याचे दिसते. येथील भूक आणि कुपोषण अधिक तीव्र झाले आहे. जगातील ३७ देशांना २०३० पर्यंत त्यांच्या भुकेची तीव्रता कमी करण्यात देखील अपयश येईल असे हा अहवाल सांगतो. याधी २०१८ मध्ये भूक निर्देशांकाच्या ११९ देशांच्या यादीमध्ये भारत १०३ व्या स्थानी होता.

संबंधित बातम्या