भारतीय-अमेरिकी नागरिकांची निदर्शने

अवित बगळे
मंगळवार, 21 जुलै 2020

वॉशिंग्टनमधील चीनी वकिलातीसमोर फलक झळकाविले

वॉशिंग्टन

भारतीय-अमेरिकी नागरिकांनी वॉशिंग्टनमधील चीनी वकिलातीसमोर रविवारी निदर्शने केली. त्यांनी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाविरुद्ध जोरदार घोषणा दिल्या.
भारतीय-अमेरिकी नागरिकांच्या एका गटाने यासाठी पुढाकार घेतला. वॉशिंग्टन व परिसरातील बांधव त्यात सहभागी झाले. त्यांची निदर्शने बहुतांश शांततापूर्ण होती. एका निदर्शकाने सांगितले की, चीनी विषाणूमुळे जगभरात लाखो लोक मारले गेले आहेत. जागतिक अर्थव्यवस्था त्यामुळे ठप्प झाली आहे.
चीनच्या गलवान खोऱ्यामधील आक्रमक कारवायांचाही निषेध करण्यात आला. `चायना कम्युनिस्ट ः डाऊन डाऊन (कम्युनिस्ट चायना मुर्दाबाद) अशा घोषणा देत त्यांनी आसमंत दणाणून सोडला.
सामाजिक कार्यकर्ते मनोज श्रीनिलायम यांनी सांगितले की, साऱ्या जगाचे कोरोनामुळे लक्ष विचलित झाले असताना तसेच चिथावणी मिळाली नसूनही चीनने केलेल्या घुसखोरीचा, जमीन बळकावण्याचा आणि लडाखमधील भारतीय भूमीत भारतीयांना मारण्याचा आम्ही निषेध करतो.
आणखी एक कार्यकर्ते महिंद्र सापा यांनी सांगितले की, गेल्या अनेक दशकांपासून भारत व इतर छोट्या देशांविरुद्ध चीन दांडगाई करतो आहे. दक्षिण चिनी समुद्रात छोट्या देशांची बेटे तसेच सागरी क्षेत्र बळकावले जात आहे. साऱ्या जगाने चीनची आर्थिक कोंडी करावी असे आमचे आवाहन आहे.

विविध संस्था सहभागी
वॉशिंग्टनशिवाय मेरीलँड, व्हर्जिनिया येथील भारतीय-अमेरिकी समुदायातील विविध सांस्कृतिक व सामाजिक संस्थांनी निदर्शनांत भाग घेतला. यात केरला असोसिएशन ऑफ ग्रेटर वॉशिंग्टन, इंडियन कल्चरल असोसिएशन ऑफ हॉवर्ड कौंटी, नॅशनल कॉन्सिल असोसिएशन ऑफ एशियन इंडियन असोसिएशन्स, दुर्गा टेम्पल फ्रेंड््स, विविध तमिळ सांस्कृतिक संघटना तसेच विश्व हिंदू परिषदेची अमेरिका शाखा अशा संस्थांचे कार्यकर्ते-सदस्य सहभागी झाले.

अलीकडे स्थापन झालेल्या न्यूयॉर्कस्थित अपोझ चायना इम्पेरियलीझम (ओसीआय) ग्रुप 23 या संस्थेनेही आपले प्रतिनिधी पाठविले होते. संजय पटेल यांनी ही माहिती दिली.

अलीकडे विविध शहरांत निदर्शने झाली आहेत. शिकागोमधील भारतीय-अमेरिकी डॉ. भरत बराई यांनी न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमध्ये निदर्शने केली. त्यात तिबेटी समाजाचे बांधवही सहभागी झाले होते.

वेबीनारचेही आयोजन
भारतीय-अमेरिकी नागरिकांनी वेगवेगळ्या माध्यमांमधून चीनविरुद्ध आवाज उठविला आहे. गेल्या आठवड्यात वेबीनार झाला. त्यात चीनमधील भारताचे माजी राजदूत गौतम बंबवाले आणि सेबीचे माजी अध्यक्ष डी. आर. मेहता यांची भाषणे झाली.

संबंधित बातम्या