इंडोनेशियात ६२ प्रवाशांना घेऊन निघालेलं विमान समुद्रात कोसळलं

वृत्तसंस्था
रविवार, 10 जानेवारी 2021

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील विमानतळावरून ६२ प्रवाशांना घेऊन निघालेले श्रीविजय कंपनीचे विमान नजीकच्याच समुद्रामध्ये कोसळल्याची घटना घडली आहे.

जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील विमानतळावरून ६२ प्रवाशांना घेऊन निघालेले श्रीविजय कंपनीचे विमान नजीकच्याच समुद्रामध्ये कोसळल्याची घटना घडली आहे. उड्डाणानंतर काही मिनिटांमध्येच या विमानाचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नजीकच्या समुद्रामध्येच या विमानाचे अवशेष आढळून आले असल्याचे तपास पथकाचे म्हणणे आहे, त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ‘बोईंग ७३७-५००’ श्रेणीतील हे ‘एस.जे १८२’ क्रमांकाचे विमान उड्डाणानंतर काही वेळेतच रडारवरून गायब झाले. नियंत्रण कक्षाशी असलेला या विमानाचा संपर्क तुटला तेव्हा ते आकाशामध्ये दहा हजार फूट उंचीवर होते.

विमानातील प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या चर्चेला अद्याप इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट दुजोरा मिळालेला नाही. तरी, समुद्रात विमानाचे काही भाग मिळाले आहेत. तसेच मानवी अवयव व विमानातील इतर वस्तूही मिळाल्या आहेत. इंडोनेशियाचे अधिकारी पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या पुराव्यांवरून विमानातील सर्वांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या