इराणने लपविली वास्तव परिस्थिती

अवित बगळे
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

रुग्णसंख्या तिप्पट असल्याचा वृत्तसंस्थेचा दावा

लंडन

इराणमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या अधिकृत आकडेवारीपेक्षा किमान तिप्पट असल्याचा दावा ‘बीबीसी’ या वृत्तसंस्थेने केला आहे. इराणमध्ये १४ हजार चारशे जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले असले तरी त्यांच्याच विविध आकडेवारींवरून जवळपास ४२ हजार जणांचा मृत्यू झाल्याचे उघड होत आहे, असे ‘बीबीसी’ने म्हटले आहे.
इराणच्या अधिकृत आकडेवारीनुसारही हा देश आखाती देशांमधील कोरोना संसर्गाच्या बाबतीत आघाडीवरील देश आहे. बीबीसीच्या अहवालानुसार, इराणने देशातील बाधितांची संख्या २,७८,८२७ अशी जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात ४,५१,०२४ रुग्णसंख्या आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्येत अचानक मोठी वाढ झाली आहे. इराणमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण फेब्रुवारीत आढळला असल्याची नोंद असली तरी प्रत्यक्षात २२ जानेवारीला कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यूही झाला होता. प्रादेशिक पातळीवरील माहिती आणि देशाची एकत्रित माहिती यात बरीच तफावत आहे. जगभरात सर्वत्रच चाचणी क्षमतेमधील तफावतीमुळे रुग्णसंख्या कमी-अधिक होत असल्याचे दिसून आले आहे. इराणमध्ये मात्र, झालेल्या मृत्युंबाबत माहिती असूनही जाणूनबुजून नोंद कमी दाखविण्यात आली आहे. हे ठरवून केले जात असल्याचा ‘बीबीसी’चा दावा आहे.

अहवालातील दावे
- तेहरानमधील मृतांची संख्या सर्वाधिक (८१२०)
- एकूण मृतांपैकी १९१६ जण विदेशी नागरिक
- मार्चमध्ये सरकारच्या आकडेवारीपेक्षा पाचपटीने अधिक संसर्ग
- मार्चच्या अखेरीस लॉकडाउननंतर रुग्णसंख्येत घट
- मे महिन्यात निर्बंध उठविल्यावर पुन्हा रुग्ण वाढले.
- पहिला रुग्ण सापडल्याचे सरकारने जाहीर केले त्यावेळपर्यंत ५२ जणांचा मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या