बापरे...! इस्त्राइलमधील औषधनिर्माण कर्मचाऱ्याला चुकून दिले लशीचे 1 ऐवजी 4 डोस

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

एका औषधनिर्माण कंपनीतील कर्मचाऱ्याला लशीचा एक डोज देण्याऐवजी एकदाच चार डोज देण्यात आले आहेत. या प्रकरणाची वार्ता काही वेळातच संपूर्ण देशभर पसरली.

तेल अवीव- कोरोनाने जगभरात थैमान घातले असून ब्रिटन आणि अफ्रिकेमध्ये नुकत्याच समोर आलेल्या कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे जगाची काळजी वाढली आहे. मात्र, काही देशांमध्ये कोरोनाच्या लशीला मान्यताही देण्यात आल्या आहेत. इस्त्राइलमध्येही मान्यता देण्यात आली असून याबाबत एक घटना घडली आहे. येथील एका औषधनिर्माण कंपनीतील कर्मचाऱ्याला लशीचा एक डोस देण्याऐवजी एकदाच चार डोस देण्यात आले आहेत. या प्रकरणाची वार्ता काही वेळातच संपूर्ण देशभर पसरली. ब्रिटेन आणि अमेरिकेनंतर इस्त्राइलमध्येही मागील आठवड्यातच लशीकरणाला सुरूवात झाली होती.    

इस्त्राईलची वेबसाईट 'द टाइम्स ऑफ इस्त्राइल'ने दिलेल्या माहितीनुसार लशीकरणाचे अतिरिक्त डोस देण्यात आलेल्या कर्मचाऱ्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. उदय अजीजी असे नाव असलेल्या संबंधित व्यक्तीने लस टोचल्यानंतर त्या जागेवरील मांसल भाग लाल झाला होता, असे सांगितले. लस टोचलेल्या जागी त्रास होत असल्याचेही या कर्मचाऱ्याने सांगितले. यानंतर लशीच्या दुसऱ्या टप्प्यातील डोस तीन आठवड्यानंतर घेणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. 

कशी घडली घटना? 
लशीकरणाचे काम दिलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याला लशीच्या डोसबाबत कल्पना नव्हती. तेथील एका पात्रात कोरोना लशीचे चार डोस ठेवण्यात आले होते. फायझर कंपनीच्या लशीच्या एका पात्रात 4 ते 5 डोस असल्याची कल्पना लस टोचणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याला नव्हती. इस्त्राइलमध्ये आतापर्यंत 30 हजार लोकांना कोरोनाची लस टोचण्यात आली आहे. या लशीचे दुष्परिणामही झाल्याचे ब्रिटन आणि अमेरिकेत बघायला मिळाले आहे.   

मागील आठवड्यातच इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनीही कोरोनापासून संरक्षण मिळावे यासाठी कोरोनाची लस टोचून घेतली होती. या लशीकरणाचे टीव्हीवर थेट प्रक्षेपणही करण्यात आले होते. इस्त्राइलमधील आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना १० रूग्णालयांमधील लशीकरण विभागात लशीचे डोस देण्यात येणार आहेत. यानंतर ही लस सामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यातही पहिल्यांदा 60 वर्षांवरील व्यक्तींना ही लस टोचण्यात येणार आहे.  

संबंधित बातम्या