‘जेम्स बाँड’च्या नायकाची एक्झिट

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

जेम्स बाँड या गुप्तहेराची व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर अजरामर करणारे अभिनेते सर शॉन कॉनरी (वय ९०) यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले.

बहामा:  जेम्स बाँड या गुप्तहेराची व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर अजरामर करणारे अभिनेते सर शॉन कॉनरी (वय ९०) यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले. येथील निवासस्थानी झोपेमध्येच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

मागील ऑगस्ट महिन्यातच त्यांनी नव्वदी पूर्ण केली होती.मूळचे स्कॉटलंडचे असलेल्या कॉनरी यांनी अनेक बाँडपटांमध्ये काम केले होते. शॉन यांनी ‘जेम्स बाँड- ००७’ या चित्रपट मालिकेतील सात चित्रपट केले. त्यानंतर तीन वर्षांपर्यंत त्यांनी एकही भूमिका स्वीकारली नाही. त्यांचे सगळेच बाँडपट कमालीचे गाजले.

अन्य चित्रपटांत भूमिका
मार्नी, मर्डर ऑन द ओरिएंट एक्स्प्रेस, द मॅन हू विल किंग, द नेम ऑफ द रोज, हायलँडर,  इंडियाना जोन्स अँड द लास्ट क्रूसेड, द हंट फॉर रेड ऑक्टोबर, ड्रॅगनहार्ट, द रॉक, फायंडिंग फॉरेस्टर अशा सुपरहिट चित्रपटांमध्येही त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.  त्यांना एक ऑस्कर, दोन बाफ्टा आणि तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले होते, हे विशेष. १९८८ साली त्यांना ''द अनटचेबल्स'' चित्रपटातील आयरिश पोलिसाच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांच्याकडून त्यांचा २००० साली सन्मान करण्यात आला होता.

संबंधित बातम्या