जपानचे पंतप्रधान शिंजो ॲबे यांचा प्रकृतीच्या कारणावरून राजीनामा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

शिंजो ॲबे म्हणाले की, दीर्घ आजारामुळे आपण पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. माझी मुदत अजून एक वर्ष आहे आणि अनेक  उद्दिष्ट्ये पूर्ण करायची आहेत. पण प्रकृती खालावत असल्याने सरकारी कामकाजावर परिणाम होऊ नये अशी माझी इच्छा आहे. यामुळेच पंतप्रधानपदाचा राजीनामा मी देत आहे.

टोकियो: जपानचे पंतप्रधान शिंजो ॲबे (वय ६५) शुक्रवारी पदावरून पायउतार झाले. ॲबे हे जपानचे दीर्घकाळ पंतप्रधान होते. ॲबे हे गेल्या काही महिन्यांपासून आजाराशी लढा देत आहेत. प्रकृतीच्या वाढत्या तक्रारींमुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी आज सांगितले.

पंतप्रधानपदाची जबाबदारी पार पाडण्यास सक्षम नसल्याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागितली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, दीर्घ आजारामुळे आपण पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. माझी मुदत अजून एक वर्ष आहे आणि अनेक  उद्दिष्ट्ये पूर्ण करायची आहेत. पण प्रकृती खालावत असल्याने सरकारी कामकाजावर परिणाम होऊ नये अशी माझी इच्छा आहे. यामुळेच पंतप्रधानपदाचा राजीनामा मी देत आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्याआधीच राजीनामा द्यावा लागत असल्याने मला वेदना होत आहेत. काही वर्षांपूर्वी उत्तर कोरियाच्या गुप्तहेराने जपानी नागरिकाचे अपहरण केले होते, तो मुद्दा आणि रशियाबरोबरील प्रादेशिक वाद सोडविण्यात अपयश आल्याचेही त्यांनी नमूद केले.

ॲबे यांना तरुण वयातच पोटासंबंधी आजार जडला आहे. उपचारामुळे हा आजार आतापर्यंत नियंत्रणात होता. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला. या महिन्यात ते दोनदा तपासणीसाठी गेले होते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या