ज्यो बायडेन यांच्या अध्यक्षपदाच्या आशा वाढल्या..पण खुर्ची अद्यापही दूर !

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

गेल्या दोन दिवसांपासून विजयाच्या समीप असलेले डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्यापासून अध्यक्षपदाची खुर्ची अद्यापही दूर आहे.कालच्या तुलनेत त्यांची यशाची शक्यता आज अधिक वाढली आहे, इतकेच. 

वॉशिंग्टन : गेल्या दोन दिवसांपासून विजयाच्या समीप असलेले डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्यापासून अध्यक्षपदाची खुर्ची अद्यापही दूर आहे.

कालच्या तुलनेत त्यांची यशाची शक्यता आज अधिक वाढली आहे, इतकेच. कालपर्यंत (ता. ५) रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची आघाडी असलेल्या जॉर्जिया आणि पेनसिल्वानिया या राज्यांत बायडेन आघाडीवर आहे. जॉर्जियामध्ये फेरमतमोजणी होईल. मतमोजणीतील विलंब आणि न्यायालयीन लढाया, यामुळे अमेरिकी निवडणुकीतील उत्सुकतेची जागा अस्वस्थतेने घेतली आहे.

जॉर्जिया, पेनसिल्वानिया, नेवाडा आणि उत्तर कॅरोलिना या चार राज्यांमधील प्राथमिक निकाल मतमोजणीच्या तिसऱ्या दिवशीही जाहीर झालेले नाहीत. यातील नेवाडा वगळता इतर राज्यांमध्ये ट्रम्प आघाडीवर होते. त्यातील जॉर्जिया आणि पेनसिल्वानिया आता बायडेन यांच्या बाजूने झुकले असले तरीसुद्धा जॉर्जियामध्ये फेरमतमोजणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. टपालाद्वारे आलेल्या मतांचा हा प्रभाव आहे. इतर राज्यांतही मतांचा फरक कमी होत असल्याने रिपब्लिकन पक्षाच्या समर्थकांची धाकधूक वाढली आहे. समर्थकांप्रमाणेच अस्वस्थ झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांनी जिंकलेल्या सर्व राज्यांमध्ये न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. आतापर्यंत चार राज्यांमध्ये त्यांनी याचिका दाखल केली असून एका राज्यात फेरमोजणीची मागणी केली आहे. दोन न्यायालयांमध्ये त्यांच्याविरोधात निकाल लागला आहे. यामुळे या लढायांमधून ट्रम्प यांना काय साध्य होणार, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. 

जॉर्जियामध्ये रात्री उशिरापर्यंत (भारतीय वेळेनुसार) बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर ९१७ मतांची अल्प आघाडी घेतली होती. पेनसिल्वानिया या २० इलेक्टोरल मते असलेल्या राज्यातही बायडेन जवळपास ७ हजार मतांनी पुढे गेले आहेत. अर्थात, चारही राज्यांत मतमोजणी पूर्ण न झाल्याने प्राथमिक निकाल कोणत्याही माध्यमाने अथवा सरकारने जाहीर केलेला नाही. जॉर्जियामध्ये १६ इलेक्टोरल मते आहेत, तर नेवाडामध्ये ६ इलेक्टोरल मते आहेत. त्यामुळे ही दोन राज्ये जिंकल्यास बायडेन यांच्याकडील इलेक्टोरल मतांची गोळाबेरीज २८६ होऊन प्राथमिक निकालात ते विजयी ठरतील. विजयासाठी एकूण ५३८ इलेक्टोरल मतांपैकी २७० मतांची आवश्‍यकता 
असते. 

ट्वीटरवर टीका
डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले काही ट्वीट आज ट्वीटरने काढून टाकले. हे ट्वीट दिशाभूल करणारे आणि वादग्रस्त असल्याचे ट्वीटरने म्हटले आहे. यावरून ट्रम्प यांनी ट्वीटरवर टीका केली आहे. 

संबंधित बातम्या