अमेरिकेत सत्तांतर; जो बायडन अमेरिकेचे 46वे मिस्टर प्रेसिडेंट

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 21 जानेवारी 2021

अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष जो बायडन यांनी 35 शब्दांत शपथ घेतली.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष जो बायडन यांनी 35 शब्दांत शपथ घेतली. कॅपिटॉल हिल येथे आयोजित सोहळ्यात भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता डेमोक्रॅट जोसेफ आर बायडेन ज्युनिअर म्हणजेच ज्यो बायडन यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली. 

कोणाकडून शपथ

अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन जी. रॉबर्ट ज्युनिअर यांनी कॅपिटॉल हिल्सच्या पश्‍चिम भागात बायडन यांना अध्यक्षपदाची शपथ दिली. त्यानंतर अध्यक्ष बायडन यांनी अध्यक्षीय भाषण केले. यावेळी त्यांनी अमेरिकी मतदारांचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी अमेरिकी सैनिकांकडून मानवंदना स्वीकारली. 

कॅपिटॉल हिलवरुन व्हाइट हाऊस

शपथविधीनंतर अध्यक्ष बायडन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस यांचे ‘प्रेसिडेंट एक्सॉर्ट’ कॅपिटॉल हिलवरून व्हाइट हाऊसकडे मार्गस्थ झाले. एरव्ही नव्या अध्यक्षाचे स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा तीन लाखाहून अधिक नागरिक उभे असतात. परंतु यंदा कोरोनामुळे रस्त्यावर अमेरिकी ध्वज लावण्यात आले. 

विशेष पाहुणे कोण

मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आजच्या शपथविधी कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. त्याऐवजी उपाध्यक्ष माइक पेन्स उपस्थित होते. याशिवाय माजी अध्यक्ष बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू बुश, बराक ओबामा यांची विशेष उपस्थिती होती. 

घरबसल्या पाहिला कार्यक्रम

प्रत्येक वेळी शपथविधीला लाखो नागरिक सहभागी होतात. परंतु कोरोनामुळे सर्व कार्यक्रमांवर मर्यादा आल्या. जॉइंट कॉंग्रेस कमिटीने कार्यक्रमांचे तिकीट केवळ कॉंग्रेस सदस्य आणि अन्य पक्षाच्या सदस्यांना दिली. त्यामुळे नागरिकांनी घरबसल्या नव्या अध्यक्षाचा शपथविधी सोहळा पाहिला.  

 व्हर्च्युअलवर भर

 बायडेन यांनी शपथविधी सोहळा अधिकाधिक व्हर्च्युअल करण्याबाबत भर दिला.राज्याच्या राजधानीत सांस्कृतिक कार्यक्रम झाले. त्यात स्थानिक बँड सहभागी झाले होते. 

भाषणाचा वाढता वेळ

1940 ते 1980 या काळात अध्यक्षांच्या भाषणात सरासरी 1612 शब्दांचा वापर झाला आहे. 1980 ते 2013 या काळात ही संख्या वाढून 2120 शब्दांवर पोचली. 2013 मध्ये ओबामा  यांचे भाषण २० मिनिटांचे होते.  यात दोन हजार शब्दांचा समावेश होता. 

 खासदारांबरोबर एकच पाहुणा

दरवर्षी दोन्ही सभागृहातील खासदार मिळून एकूण 2 लाख तिकीट दिले जातात. ही मंडळी आपापल्या मतदारसंघातील नागरिकांना तिकिटाचे वाटप करतात. यावेळी प्रत्येक खासदाराला दोन तिकिटे देण्यात आली. म्हणजेच 538 खासदारांसमवेत केवळ एकच पाहुणा उपस्थित राहिला.

सर्वात लहान भाषण

पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे भाषण सर्वात कमी काळाचे ठरले. त्यांनी 1793 मध्ये केवळ 135 शब्दांचा वापर केला.

सर्वांत मोठे भाषण

1841 रोजी विल्यम हेन्री हॅरिसन यांचे भाषण सर्वात दीर्घकाळाचे ठरले. त्यांनी 1 तास 45 मिनिटे भाषण केले आणि त्यात 8445 शब्दांचा समावेश होता. कडाक्याच्या थंडीत हॅट आणि कोट याचा पेहराव न करता त्यांनी भाषण केले. त्यानंतर त्यांना न्यूमोनिया झाला. अध्यक्ष झाल्यानंतर महिनाभरात त्यांचे निधन झाले.

टीव्हीवरचे पाहिलेले पहिले भाषण

1949 रोजी अध्यक्ष हॅरी एस ट्रुमन यांचे भाषण दूरचित्रवाणीवरून पहिल्यांदा प्रसारित करण्यात आले. त्यावेळी अमेरिकेत केवळ 44 हजार टिव्ही संच होते.

संबंधित बातम्या