ट्रम्प म्हणातायत..मी आधीच विजयी झालोय, तर अध्यक्ष म्हणून शपथ घेणार असा ज्यो बायडेन यांचा दावा

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

अत्यंत तुल्यबळ ठरत असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कालच्या तुलनेत आज मतमोजणीची गाडी थोडीशी पुढे सरकली. यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांना आणखी सहा इलेक्टोरल मतांची आवश्‍यकता आहे. 

वॉशिंग्टन : अत्यंत तुल्यबळ ठरत असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कालच्या तुलनेत आज मतमोजणीची गाडी थोडीशी पुढे सरकली. यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांना आणखी सहा इलेक्टोरल मतांची आवश्‍यकता आहे. 

बहुमतासाठी तब्बल ५६ मतांची आवश्‍यकता असलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनीही विजय मिळण्याची आशा कायम ठेवली आहे. कोरोना संसर्गाच्या स्थितीमुळे प्रचंड प्रमाणात झालेले टपालाद्वारे मतदान हे यंदाच्या विलंबाचे प्रमुख कारण ठरत आहे.
विविध माध्यमांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, ज्यो बायडेन यांना विजयासाठी ६ ते १७ इलेक्टोरल मते कमी पडत आहेत. ट्रम्प यांचा रथ २१४ जागांवर अडकला आहे. अध्यक्ष होण्यासाठी एकूण ५३८ पैकी २७० इलेक्टोरल मते मिळणे अत्यावश्‍यक आहे. मतपत्रिकांची मोजणी, पेनसिल्वानिया राज्यात मतपत्रिका स्वीकारण्यासाठी वाढवून दिलेला तीन दिवसांचा अवधी, ट्रम्प यांची न्यायालयीन लढाई यामुळे निकालाबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. जाहीर होणारे हे निकाल प्राथमिकच असले आणि निवडणूक आयोग १० तारखेनंतरच अधिकृत निकाल जाहीर करणार असला तरी या प्राथमिक निकालानंतर चित्र स्पष्ट होते. यंदा मात्र तसे झालेले नाही. जॉर्जिया, पेनसिल्वानिया, उत्तर कॅरोलिना, नेवाडा या राज्यांमध्ये मतमोजणी सुरु असल्याने अधिकाऱ्यांनी प्राथमिक निकालही जाहीर केलेले नाहीत. 

"देशात फार मोठा गैरप्रकार सुरु आहे. माझ्या दृष्टीकोनातून मी आधीच विजयी झालो आहे. "
- डोनाल्ड ट्रम्प, 
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार

"अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून मीच शपथ घेणार आहे. अध्यक्षपद हे राजकारण खेळण्याचे पद नाही. "
- ज्यो बायडेन, 
डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार

 

संबंधित बातम्या